शॉक लागलेल्या गारखेड्याच्या तरुणाचा डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:37 PM2019-11-19T22:37:38+5:302019-11-19T22:37:43+5:30
सदोष मनुष्यावधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी : नागरिकांचे रास्तारोको आंदोलन
धरणगाव : तालुक्यातील गारखेडा येथील वीसवर्षीय तरुणाला १९ रोजी सकाळी विद्युत तारांचा शॉक लागला. त्यास उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथे डॉक्टर नसल्याने त्या तरुणाचा उपचाराअभावी तडफडत मृत्यू झाला.
या तरुणाला वेळीच उपचार मिळाला असता तर त्याचे प्राण वाण वाचले असते अशा संतप्त भावना व्यक्त करीत येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व गारखेडा ग्रामस्थांनी उड्डाण पुलाजवळ रास्तारोको आंदोलन केले. तसेच दांडीबहाद्दर डॉक्टरांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तब्बल दीड ते दोन तास झालेल्या या रास्ता रोकोमुळे एक किमीपर्यंत वाहतूक खोळंबली होती. तहसिलदार व पोलीसांनी वेळीच आंदोलनकर्त्यांची समजूत काढून लेखी आश्वासन दिल्याने वातावरण निवळले.
मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गारखेडा येथील विलास कैलास पाटील (वय २०) या युवकाला सुकलेले कपडे काढत असताना विद्युत तारांचा शॉक लागला. त्याला तत्काळ त्याच्या भावाने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु या ठिकाणी एकही डॉक्टर नसल्याने त्याच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे तडफडत त्याचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त गावकऱ्यांनी व शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी एक ते दीड तास रुग्णालयाबाहेर रास्ता रोको आंदोलन केले.
कर्तव्यावर गैरहजर आसलेल्या डॉक्टराविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, असा पवित्रा घेतला होता.
चौकशीसाठी सी.एस.दाखल...
या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, आरएमओ डॉ.सुनिल बन्सी हे तातडीने दाखल झाले. त्यांनी तहसिलदार नितीनकुमार देवरे, सपोनि हनुमंत गायकवाडे आदींशी चर्चा केली. गैरहजर डॉक्टरविरुध्द कारवाई व वीज कंपनीकडून भरपाई मिळण्यासाठीचा प्रस्ताव तहसिलदारांनी तयार करुन सी.एस.ला दिला व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला. डॉ.गिरीष चौधरी यांना निवासस्थानी राहणे बंनकारक असताना ते का थांबत नाहीत, यावरही चर्चा झाली.