आठ नद्यातून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 03:20 PM2019-04-14T15:20:02+5:302019-04-14T15:20:47+5:30
जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शहा यांनी जानेवारी महिन्यात बांगला देशात भेट दिली. यावर आधारित त्यांनी प्रवास वर्णन लिहिले आहे. आज त्यांच्या लेखमालेतील सहावा भाग ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत...
तेतुलीया नदीतून स्पीड बोट पकडण्यासाठी साधी, अरुंद, छोटी ‘जेट्टी’ होती. साधारण तीन फुटांच्या या जेट्टीच्या दोन्ही बाजूंनी बांबू आणि लाकडी बल्ल्या उभे पाण्यात गाडले होते. ते कुठे गुढग्याएवढे तर कुठे खांद्याइतके जेट्टीच्यावर आलेले होते. त्यात काही उभ्या बांबूंची टोके उघडी होती आणि प्रत्येक पेरात पाणी भरलेले होते. त्यात काही हालचाल दिसत होती म्हणून मी सहज त्यात डोकावून पहिले. त्यात अगदी छोटे काटबोरांएवढे जीव होते. आधी फुंकर मारून पहिले. मग कुणालातरी बोट लावू का विचारले. (हो नाहीतर मारुतीच्या बेंबीत बोट टाकल्यासारखे व्हावे.) बोट लावले तर ते पटकन स्वत:ला आवरून खाली गेले.
तेतुलीयाच्या किनाऱ्यावर उतरून आम्ही चक्रीवादळ सहायता केंद्रात पोहोचलो. येथेही पुन्हा मोटार सायकलनेच. तेव्हा ११ वाजले होते. म्हणजे सदरघाटहून येथपर्यंत १५ तासांचा आणि साधारण सव्वा सहाशे कि.मी.चा प्रवास झाला. त्यात आम्ही बुरीगंगा, सितालख्या, मेघना, पद्मा, किटनखोला, बिघाई, गालाचीपा आणि तेतुलीया अशा आठ नद्यांमधून जलमागार्ने प्रवास केला.
रंगबलीच्या चक्रीवादळ मदतकेंद्राला भेट देण्यासाठी आम्ही गेलो होतो. तेथे दोन तासात सगळ्या गोष्टींची पाहणी करून फोटो घेऊन आम्ही परत निघालो. रंगबली गावातून जाताना एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली. आपल्याकडे शेणाच्या गोवºया थापून वाळवून जळण म्हणून वापरतात. तेथे शेणाच्या वेगळ्याच प्रकारच्या गोवºया होत्या. शेण एखाद्या वाळलेल्या काटकीला थापून त्याचा एक साधारण दोन ते चार फूट लांबीचा रोल करून तो वाळवतात. याला साठवायला जागा कमी लागते. त्याची मोळीही बांधता येते. बांबूवर टेकवून सहज उभ्या करता येतात. आपल्याकडच्या गोवऱ्यांच्या मानाने पातळ थरामुळे जाळताना बहुतेक धूर कमी होत असावा.
आणखी एक वेगळी गोष्ट पाहिली- ती म्हणजे लहान मच्छिमारी नाव कशी बांधतात ते. रंगबलीच्या किनाºयावर अशा एका नावेचे काम चालू होते ते जवळून पाहता आले.
परतताना मात्र रंगबलीच्या किनाºयावर जायला मोटार सायकल मिळाली नाही. ‘फॉट्फॉटी’ मिळाली. ही ‘फॉट्फॉटी’ म्हणजे दोन बाय चारच्या खुल्या लाकडी सपाट पाट्यावर बसायचे. याच्या खाली दोन चाके. समोर सायकलसारख्या सीटवर ड्रायव्हर. त्याच्या पुढे एक चाक. इंजिन ‘फॉट्फॉटी’चे. बाकी पुन्हा त्याच मार्गाने परतीचा प्रवास करीत बारिसाल येथे एमव्ही अॅॅडव्हेन्चर-९ ने आम्हाला रात्री सात वाजता घेतले आणि ३० जानेवारीला सकाळी सहा वाजता ढाक्क्याच्या सदर घाटावर सोडले.
आम्ही सदरघाटहून थेट रंगबलीला नेणाºया जलमार्गानेच गेलो असतो तर एकतर खूप उशिरा पोहोचलो असतो आणि रात्री परत जायला पुन्हा मार्ग नाही. मार्ग धोक्याचा असल्याने येणारी लाँच रात्री परत प्रवास करीत नाही. त्यावरच मुक्काम करावा लागला असता आणि तिसºया दिवशी सकाळी निघून रात्री पोहोचलो असतो. शिवाय ती लाँच अगदी यथातथाच होती. त्यात प्रवास धोक्याचा होताच.
या अनोख्या प्रवासाने अतिशय वेगळा आणि रोमांचक अनुभव दिला. इतके धक्के खाल्ले आणि अगदी हळू चालणाºया फेरीपासून अगदी झिंग येईल इतक्या वेगात जाणाºया स्पीडबोटपर्यंत वेग आणि वाहने बदलावी लागली, अनुभवली. पण अख्खा एक दिवस वाचवला. शिवाय तोडक्या-मोडक्या लाँचमधून प्रवास आणि तिच्यातच मुक्काम करण्यापासून आम्ही आमची सुटका करून घेतली होती. (क्रमश:)
-सी. ए. अनिलकुमार शहा, जळगाव