एसटी बसनंतर पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:11+5:302021-06-10T04:12:11+5:30
सुविधा : मात्र कोरोनामुळे प्रवाशांचा अद्यापही अल्प प्रतिसाद जळगाव : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर महामंडळाच्या बस पुणे, मुंबई मार्गावर सुरू ...
सुविधा : मात्र कोरोनामुळे प्रवाशांचा अद्यापही अल्प प्रतिसाद
जळगाव : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर महामंडळाच्या बस पुणे, मुंबई मार्गावर सुरू झाल्यानंतर यापाठोपाठ विविध खाजगी कंपन्यांच्या ट्रॅव्हल्सही पुणे, मुंबई मार्गांवर सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनामुळे अद्यापही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याचे ट्रॅव्हल्स कंपनीतर्फे सांगण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दीड महिना कडक लॉकडाऊन केल्यामुळे शहरातील विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या व्यावसायिकांनीही आपल्या ट्रॅव्हल्स बंद ठेवल्या आहेत. यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले.
मात्र, कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाण सर्वत्र कमी झाल्यानंतर शासनाने राज्यात सर्वत्र शिथिलता आणली आहे. यामुळे महामंडळाची बससेवा सर्व मार्गांवर सुरू झाल्यानंतर दोन दिवसांपासून शहरातील पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सही सुरू झाल्या आहेत.
पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे विविध कंपन्यांच्या ट्रॅव्हल्स पुणे व मुंबईला जात आहेत. दरम्यान, सध्या कुठलीही भाडेवाढ करण्यात आली नसून, पूर्वीचेच भाडेदर असल्याचे ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फे सांगण्यात आले.
इन्फो:
प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बसची संख्याही कमी
लॉकडाऊन उठविल्यानंतर ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फेही बसप्रमाणे पुणे व मुंबईसाठी ट्रॅव्हल्सही सुरू केल्या आहेत. मात्र, या गाड्यांना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सध्या जळगाव शहरातून नियमित धावणाऱ्या ५० ते ६० गाड्यांपैकी २५ ते ३० गाड्या पुणे, मुंबई मार्गावर जात आहेत. जसजसा प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल, त्यानुसार बसची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे हा व्यवसाय करणे दिवसेंदिवस अवघड होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
इन्फो:
लॉकडाऊनमुळे दीड महिन्यापासून बंद असलेल्या ट्रॅव्हल्स पुन्हा पुणे व मुंबईसाठी सुरू झाल्या आहेत. मात्र, कोरोनामुळे अद्यापही प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे नियमित धावणाऱ्या ट्रॅव्हल्सपैकी निम्म्या ट्रॅव्हल्सच सुरू झाल्या आहेत.
-प्रमोद झांबरे, सचिव, जळगाव जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन
लॉकडाऊन उठल्यानंतर आता जळगावहून पुणे व मुंबई मार्गावरही ट्रॅव्हल्स सुरू झाल्या आहेत. मात्र, प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. त्यात डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.
-हितेश गाडे, ट्रॅव्हल्स व्यावसायिक