उपचारात हलगर्जीपणा, जळगावात पाच डॉक्टरांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:53 AM2017-10-18T11:53:25+5:302017-10-18T11:54:05+5:30
तरुणीला आले अपंगत्व
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 18 - उपचारात हलगर्जीपणा केल्याने ममता अनिल तायडे या तरुणीला अपंगत्व आल्याने गणपती हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. शितल रुपचंद ओसवाल, डॉ.अजय कोगटा, डॉ.लिना अनुज पाटील, डॉ. विशाल पिंपरिया व डॉ. अमित हिवरकर या डॉक्टरांविरुध्द मंगळवारी ममता हिच्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा कलम 338 (हलगर्जीपणा)प्रमाणे दाखल झाला.
काय आहे प्रकरण?़़़ पोलीस कर्मचारी अनिल तायडे यांच्या दुचाकीला 29 जुलै 2017 रोजी महामार्गावर अपघात झाला होता. त्यात मुलगी ममता हिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तायडे व त्यांच्या मुलीला गणपती हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते. एक्स रे काढल्यानंतर ममताच्या पायाला प्लास्टर बांधण्यात आले होते व या प्लास्टरमुळे तिच्या पायाच्या नसा तुटून पाय हत्ती रोगासारखा सुजला होता. चूक लक्षात आल्यानंतर डॉ.लिना पाटील यांनी प्लास्टर कापून रुग्णाला नाशिक येथे हलविले होते.
तज्ज्ञांच्या समितीने अभिप्राय दिल्यानंतर दाखल झाला गुन्हा
जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या तज्ज्ञाच्या समितीकडे हे प्रकरण गेले. त्यांनी उपचाराचे कागदपत्रे व रुग्ण यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उपचारात हलगर्जीपणा झाल्याचे निष्पन्न झाले. तसा अभिप्राय या समितीने पोलिसांना दिला व त्यानुसार मंगळवारी हा गुन्हा दाखल झाला.
नाशिक येथे ममता हिच्या पायावर 5 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर पुढच्या शस्त्रकियेसाठी पुण्यात नेण्यात आले. तेथेही 3 शस्त्रक्रिया झाल्या. इतक्या शस्त्रक्रिया झाल्यावरही मुलगी स्वत:च्या पायावर उभी राहूशकतनाही. चुकीच्या प्लास्टरमुळे या शस्त्रक्रिया कराव्या लागल्याचे नाशिकच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
चुकीच्या प्लास्टरमुळे मुलीवर शस्त्रकिया कराव्या लागल्या व तरीही ती पायावर उभी राहत नसल्याने गणपती हॉस्पिटलचे डॉ.शितल ओसवाल व संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा यासाठी अनिल तायडे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.
आमचा न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे. त्यामुळे चौकशीला संपूर्ण सहकार्य केले जाईल.
-डॉ.तेजस जैन, व्यवस्थापक, गणपती हॉस्पिटल