जन्मदात्या मातापित्यांप्रमाणेच वृक्ष सेवा करून वृक्ष संवर्धन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 06:39 PM2020-09-26T18:39:46+5:302020-09-26T18:39:57+5:30
कुलगुरू पी .पी. पाटील यांचे प्रतिपादन : १०१ वृक्षांचे रोपण
जळगाव : जन्मदात्या मातापित्यांप्रमाणेच वृक्ष सेवा करून वृक्ष संवर्धन करावे, असे प्रतिपादन बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलगुरू मा . पी.पी. पाटील यांनी केले.
जनमत प्रतिष्ठान व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे १०१ वृक्ष रोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंकज नाले, विजय लुल्हे आदी उपस्थित होते. निवृत्ती नगर येथील कार्तिक स्वामी मंदिराच्या प्रांगणात कुलगुरू पाटील यांच्या हस्ते नीम, चिंच, सीताफळ या वृक्षांचे रोपण करून अभियानास प्रारंभ झाला. त्याप्रसंगी नगरसेविका अनिता सोनवणे, प्रतिभा देशमुख, विजय पाटील , विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, सहाय्यक फौजदार विश्वासराव पाटील यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला कै.किसन नाले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कुलगुरू यांनी केले. त्यानंतर नाले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पुस्तक दिले भेट
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने विजय लुल्हे प्रकाशित गांधीजींचे सात सामाजिक पातके व एकादश व्रते पोस्टर्स कुलगुरू पी .पी. पाटील तसेच मान्यवरांना लुल्हे यांनी सन्मानपूर्वक भेट दिली. नंतर कुलगुरू यांच्या हस्ते एस . के .पवार यांना वृक्ष दान करण्यात आले. कार्यक्रमास प्रा.वासुदेव पाटील, विवेक देसाई, राहुल लोखंडे, प्रशांत सुर्वे आणि परिसरातील वृक्षप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनमत प्रतिष्ठानचे सदस्य हर्षाली पाटील , वेदांत नाले ,चित्रा मालपाणी, भारती नाले यांनी परिश्रम घेतले.