शेंदुर्णी नगर पंचायतीमार्फत वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 12:24 PM2021-08-05T12:24:01+5:302021-08-05T12:24:32+5:30
माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
शेंदुर्णी (ता. जामनेर) : येथील चक्रधरनगरातील खुल्या भूखंडात गुरुवारी माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली.
नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सर्व नगरसेवक व कर्मचारी वृंद व नागरिक यांच्या उपस्थितीत मोहिमेस सुरुवात करण्यात आली..
वृक्षांमध्ये वड, पिंपळ, गुलमोहर, उंबर, करंज, पुत्रंजिवा, चिंच व बकुळ अशी भारतीय प्रजातींचे वृक्ष लावण्यात आले.
संपूर्ण शेंदुर्णी हरित व्हावे या हेतूने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे व भविष्यातही करण्यात येणार आहे. निसर्गाचा समतोल राखावा, शेंदुर्णी शहर प्रदूषणमुक्त राहावे, यासाठी माझी वसंधुरा अभियान सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे नगराध्यक्षा खलसे यांनी सांगितले.
सर्वांना स्वच्छता, आरोग्य, निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी तसेच वसुंधरेशी संबंधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदलाचे महत्त्व सांगून स्वच्छ व सुंदर शेंदुर्णी कसे करता येईल, यासंदर्भात उपनगराध्यक्षा अग्रवाल यांनी माहिती दिली.
माझी वसुंधरा हे अभियान शासन संपूर्ण महाराष्ट्रात राबवित आहे. ही केवळ सरकारी मोहीम किंवा अभियान न राहता, प्रत्येकाने पर्यावरणातील बदल लक्षात घेऊन आपली जीवनशैली पर्यावरणपूरक केली पाहिजे. या मोहिमेत वृक्ष लागवडीबरोबर वृक्षाचे संवर्धन करणे व शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे, याची संकल्पना व माहिती मुख्याधिकारी पिंजारी यांनी दिली.