वृक्षगान

By admin | Published: June 17, 2017 05:42 PM2017-06-17T17:42:11+5:302017-06-17T17:42:11+5:30

‘व्हॅन गॉग’ नावाच्या प्रसिद्ध चित्रकाराने आपल्या अल्पायुष्यात अनेक झाडे जी चितारली

The trees | वृक्षगान

वृक्षगान

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17 - झाडे-झुडपे, वृक्ष याबाबत लिहायचे म्हटले तर माङया डोक्यात सगळ्यात पहिले हा विचार येतो; तो हा की- वाटतात तितकी ती कागदावर नेमकी उतरवणे सोपे नसते! आणि लगोलग दुसरा विचार येतो तो- त्यांना वाढवणे, त्यांच्यावर प्रेम करणे हेदेखील फारसे सोपे नसते.. ‘व्हॅन गॉग’ नावाच्या प्रसिद्ध चित्रकाराने आपल्या अल्पायुष्यात अनेक झाडे जी चितारली, ती मात्र त्यांच्या त्या कॅन्व्हसवरील झाडांना जिवंत करून ठेवणारी ठरली आहेत. जमिनीवर तर झाडे उगवतातच, याने ती जमिनीशिवाय हरित केलीत!
झाडांचे सारे अंगोपांग याने अनेक ठिकाणी असे  नमूद केले की नजर हटू नये. खोड, फांद्या, पाने, फुले आणि सगळ्यात महत्त्वाचे ते त्या त्या झाडाचे कॅरेक्टर! आहाहा! पण त्याही पुढे जाऊन मला स्वत:ला असे नेमकेच वाटते की गॉगने झाडांची अगदी खोलवर पसरलेली मुळेसुद्धा जमिनीखाली कशी पसरली असतील, ते दाखवले! भूमी फोडून एखादा मोठा वृक्ष किंवा लहानगी वेल आभाळाकडे कसे ङोपावतात, ते गॉग जाणत होता आणि त्याचा कुंचला! झाडे, निसर्ग त्याच्याशी बहुतेक बोलत असावेत! गॉग तसे ते आपल्याशी कॅन्व्हसची मदत घेत बोलतो.. आणखीनही मला आपल्याशी बोलायचे आहे ते म्हणजे आपण वृक्षांकडे अजिबातच रूक्षपणे बघत नाही. त्याचे महत्त्व आपण सदियोंसे जाणतो. त्याला देव मानतो. आपला धर्मच आहे- ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरी..’ त्याची आपण जी पूजा बांधतो ती उगीचच नसते. आदिवासी लोकांत एक फार चांगली पद्धत आहे- सकाळी सकाळी उठायचे आणि समोरच्या मोठय़ा बुंध्याला मिठी मारायची! त्याला कवटाळले की मग कळीकाळाचे भय नाही! एक आणखीन गंमतीचे वाटते. मला आजर्पयत जुळे झाड दिसलेले नाही! अगदी एकसारखी समोरासमोर किंवा शेजारी-शेजारी एकसारखी दिसणारी दोन झाडे आपण पाहिली आहेत का? प्रवासात मी कधीच कंटाळत नाही. खिडकी असते आणि त्यातून झाडे दिसतात. सगळी वेगवेगळी, मनभावन, आकर्षक, लयबद्ध वाढलेली. फोटोजेनिक! कमनीय! ही खरे तर मागे- मागे पडत जातात आणि तुमचे वाहन पुढचा रस्ता कापत असते; पण रस्ताही संपत नाही आणि त्या झाडांचा पिच्छासुद्धा. तो तेव्हाच संपतो, जेव्हा तुम्ही आपापल्या अंगणात किंवा मग जमेल तेथे वृक्षारोपण करतात! झाडे मग तुमच्या डोळ्यांसमोर मोठी होतात, पण त्यांची फळे पुढच्या पिढींसाठी असतात. झाडांचा हा गुण आपण मनोभावे घेतला आहे ते एक बरे आहे. एखादे 100/150 वर्षाचे झाड बघितले आणि त्याचा तो गर्द, मोठ्ठा फेर बघितला तर मी तोंडात बोट घालण्याचेही विसरत जातो. आपण जर तरसोदच्या गणपतीचे दर्शन घेतले असेल तर तिथे एक चिंच आणि वड इतके मोठ्ठे झालेत की त्यांची छाया त्या सुंदर देवालयाला आणखीनच प्रसन्न करून टाकते. पाचोरा-भडगाव रोडवर वडगाव नावाचे खेडे आहे. त्याच्या अगदी जवळच एक मोठ्ठा वड पसरला आहे. याची निगा तिथले शेतकरी घेतात. आभाळे जितके मोठे आपणास गमते अगदी  तितकाच मोठा घेर याचा आपल्या डोक्यावर आहे! त्याच्या पारंब्यांची झाडे झाली आहेत. आपल्यापैकी अनेकांना मी अजिबातच अतिशयोक्ती करत नाहीये. यावर विश्वास बसेल, कारण आपण ते महाकाय शिल्प प्रत्यक्ष बघितले असेल, त्याला हात लावून नमस्कार केला असेल. आपण वस्त्या वाढवतो. घरे बांधतो. गावे वसवतो. एक लक्षात घेतो का? की तसे ते आपल्या डोक्यावर छप्पर बांधताना लक्षावधी किडय़ा- मुंग्याच्या, पक्षी पाखरांच्या झाडरूपी ज्या कॉलन्या असतात, त्या उद्ध्वस्त होत आहेत? मला छप्पर हवे तर ते तेव्हा जेव्हा पाखरांची कॉलनी बांधून झाली असेल. असो. मोहाडी रोडवरमध्ये एक दुभाजक आहे. त्यात मनपाने काही झाडे लावलीदेखील होती. पण ती या ना त्या कारणाने जगली नाहीत. बाभळीचेही काटे लावले होते. ते जगलेले दिसतात! फिरायला जाताना कोणी दुभाजकावर बसून आपला व्यायामाचा ‘रिदम’ मध्येच सोडून बसू नयेत, याची ते काटे नेमकेपणीच काळजी घेतात!
- प्रदीप रस्से 

Web Title: The trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.