किमान तीन हजार रुपये निवृत्ती वेतनासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:44 PM2018-05-24T12:44:49+5:302018-05-24T12:44:49+5:30
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनचे विश्वस्त प्रभाकर बाणासुरे यांची माहिती
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २४ - कर्मचारी भविष्य निधी संघटनचे सदस्य असलेल्या निवृतीवेतनधारकांना सध्या मिळणारे किमान एक हजार रुपये निवृत्ती वेतन अत्यंत तुटपुंडे असून त्यात वाढ करून ते किमान तीन हजार रुपये करण्यासाठी संघटनचा प्रयत्न आहे, अशी माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनचे विश्वस्त प्रभाकर बाणासुरे यांनी दिली.
‘लोकमत’च्या शहर कार्यालयात बाणासुरे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला त्या वेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचीही माहिती दिली. ‘लोकमत’चे वरिष्ठ उप संपादक विकास पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
निवृत्तीवेतन वाढीसह महागाई भत्ता
२० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या अस्थापनेतील संघटीत असो वा असंघटीत कामगार हे कर्मचारी भविष्य निधी संघटनचे सदस्य होऊ शकतात. या कर्मचाºयांच्या वेतनातून १२ टक्के कपात होण्यासह अस्थापना मालकाचा १२ टक्के वाटा मिळून २४ टक्के रक्कम संबंधित कर्मचाºयाच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होत असतो. कर्मचाºयाचे निवृत्तीवेळी असलेले वेतन व त्याचा सेवा काळ यावर त्याचे निवृत्ती वेतन ठरते. त्यानुसार सध्या हे निवृत्ती वेतन किमान १ हजार रुपये आहे. ते अत्यंत तोडके असल्याने त्यात वाढ होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे प्रभाकर बाणासुरे यांनी सांगितले. यामध्ये ते किमान तीन हजार रुपये असावे व त्या सोबतच महागाई भत्ता मिळावा, अशी मागणी असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे बाणासुरे यांनी सांगितले.
....तर डिसेंबर पूर्वी निवृत्ती वेतनात वाढ
सध्या निवृत्ती वेतन धारकांना देण्यात येणाºया निवृत्तीवेतनात केंद्र सरकारचा केवळ १.१६ टक्के वाटा आहे. निवृत्तीवेतन वाढ करीत असताना यात सरकारचाही सहभाग वाढणे आवश्यक असल्याचे बाणासुरे म्हणाले. त्यानुसार केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आपला वाटा वाढविला तर डिसेंबर पूर्वीच निवृत्तीवेतनात वाढ होऊ शकते, अशी सुखद माहितीही त्यांनी दिली.
एका क्लिकवर पीएफची माहिती
संघटनच्यावतीने तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा कर्मचाºयांना करून दिला जात असून आपल्या भविष्य निर्वाह निधीबद्दल माहिती व्हावी यासाठी संघटनच्यावतीने अॅप तयार करण्यात आले आहे. आपला क्रमांक टाकल्यानंतर मोबाईलवरच भविष्य निर्वाह निधीची माहिती मिळू शकेल, असेही बाणासुरे यांनी सांगितले.
तीन दिवसात मिळणार रक्कम
भविष्य निर्वाह निधीमधून रक्कम काढायची झाल्यास आता कर्मचाºयांना आॅनलाईन अर्ज करून तीन दिवसात ही रक्कम मिळू शकेल, अशीही माहिती बाणासुरे यांनी दिली. त्यानुसार जेवढी रक्कम काढायची आहे तेवढी रक्कम टाकून संपूर्ण माहिती अचूक भरून आॅनलाइन अर्ज करता येऊ शकतो. यासोबतच आॅनलाइन कर्मचाºयाचे नाव व इतर संपूर्ण माहिती अचूक उपलब्ध असल्यास निवृत्तीनंतर सातव्या दिवशी निवृत्ती वेतनही आता सुरू होत असल्याचे बाणासुरे म्हणाले. मात्र यासाठी अस्थापना व्यवस्थापनाने पुरेसी व अचूक माहिती पुरविणे, आधार कार्ड लिंक असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवृत्तांना मोफत वैद्यकीय सुविधा
कर्मचारी भविष्य निधी संघटनच्या निवृत्तीधारकांसह त्यांच्या कुटुंबीयांना मोफत वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बाणासुरे यांनी सांगितले. सध्या दिल्लीमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू असून लवकरच देशभरात तो लागू केला जाईल, असेही ते म्हणाले. यामध्ये ईएसआयसीच्या रुग्णालयांसह त्यांचा करार असलेल्या मोठ्या रुग्णालयांध्येही वैद्यकीय सेवा मिळू शकेल.
पीएफवरील व्याजदर वाढीसाठी प्रयत्न
सध्या भविष्य निर्वाह निधीवर मिळणाºया व्याजदरात कपात होत आहे. हे व्याज कर्मचाºयांना जास्त मिळावे, यासाठी संघटनच्यावतीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा विचार करण्यात आला. मात्र त्यास काहीसा विरोध झाल्याने सध्या ही गुंतवणूक थांबविली आहे. मात्र एक्सचेंज ट्रेडिशनल फंडमध्ये ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्यातून परतावाही चांगला मिळत आहे. त्यामुळे पीएफवरील व्याज वाढून मिळण्यास यामुळे मदत होऊ शकते, असे बाणासुरे म्हणाले. पुढे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक झाल्यास संघटनचा प्रत्येक सदस्य शेअर मार्केटशी जोडला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कर्मचाºयांनी जागृत रहावे
कर्मचारी भविष्य विधी संघटनचे सदस्य झाल्यास त्यात अस्थापना मालकाला १२ टक्के आपला हिस्सा द्यावा लागतो. त्यामुळे अनेक अस्थापना मालक संघटनचे सदस्य होण्याबाबत अनुत्सुक असतात. यामध्ये कर्मचाºयांचे नुकसान होते. त्यामुळे कर्मचाºयांनी जागृत रहावे, असे आवाहनही बाणासुरे यांनी केले. कर्मचाºयांसाठी तीन योजना असून यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी १९५२ या योजनेत निवृत्ती वेतन न मिळता केवळ जमा रक्कम व्याजासह मिळते. कर्मचारी पेन्शन फंड योजनेत निवृत्ती वेतन तर कर्मचारी भविष्य निधी विमा योजनेत निवृत्तीवेतन व सहा लाखापर्यंत विमा संरक्षणही मिळते, अशी माहिती बाणासुरे यांनी दिली.
लहान अस्थापनांचाही होणार सहभाग
ज्या ठिकाणी १० कामगार आहे, अशा अस्थापनाही आता कर्मचारी भविष्य निधी संघटनच्या सदस्य होऊ शकणार आहेत. सध्या ही मर्यादा २० असून लहान अस्थापनांमधील कर्मचाºयांना याचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे बाणासुरे म्हणाले. यापुढे मूळ वेतनाऐवजी मूळ वेतन व मिळणाºया एकूण भत्यांची रक्कम यावरील १२ टक्के रक्कम ही भविष्य निर्वाह निधीत जमा करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही बाणासुरे म्हणाले.
जळगावात प्रादेशिक कार्यालय
कर्मचारी भविष्य निधी संघटनच्या सदस्यांना सोय व्हावी यासाठी जळगाव, धुळे, नंदुरबारसाठी प्रादेशिक कार्यालय असावे, यासाठी ते जळगावात सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे बाणासुरे यांनी सांगितले.
देशाच्या विकासात ८ लाख करोडचे भाग भांडवल
कर्मचारी भविष्य निधी संघटन ही भारतीय आयुर्विमा महामंडळानंतर दुसरी मोठी आर्थिक उलाढाल असलेली संस्था आहे, असे बाणासुरे म्हणाले. संघटनच्यावतीने देशाच्या विकासात ८ लाख कोटींचे भाग भांडवल गुंतविले असल्याचे बाणासुरे म्हणाले. दर महिन्याला ५४३ कोटींची संघटनच्यावतीने गुंतवणूक केली जाते,असेही ते म्हणाले. देशातील १० लाख २४ हजार १८८ अस्थापना यात सहभागी असून १९ कोटी ३३ लाख ९१ हजार ८६० सदस्य असून यापैकी ४ कोटी १२ लाख ३७ हजार ३८४ सदस्य नियमित अंशदान जमा करतात, असे बाणासुरे यांनी सांगितेल. यात सर्वाधिक सदस्य संख्या ही महाराष्ट्राची असल्याचेही ते म्हणाले.