शेंदुर्णी येथे नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 04:22 PM2020-02-02T16:22:14+5:302020-02-02T16:22:34+5:30
नागरिकता संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ शेंदुर्णी येथे रविवारी राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली.
शेंदुर्णी, ता.जामनेर, जि.जळगाव : नागरिकता संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ शेंदुर्णी येथे रविवारी राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. यात हजारो नागरिक सहभागी झाले होते.
सकाळी साडेआठला वाडी दरवाजा भागातून तिरंगा रॅलीस प्रारंभ झाला. शहरातील मुख्य मार्गावरुन निघालेल्या या रॅलीत या कायद्याच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. शेंदुर्णी दूरक्षेत्रात तिरंगा रॅलीचे छोटेखानी सभेत रूपांतर झाले.
प्रास्ताविक राष्ट्रीय सुरक्षा मंचचे जामनेर तालुका समन्वयक राजेंद्र भारुडे यांनी केले व या कायद्याची माहिती देवून या तिरंगा रॅलीच्या आयोजनाची माहिती दिली. यावेळी प्रमुख वक्ते अभाविपचे कार्यकर्ते मनोज जंजाळ यांनी या कायद्याबद्दल सविस्तर माहिती दिली.
शेवटी या कायद्याच्या समर्थनार्थ राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीने पहूर पोलीस स्टेशनचे सपोनि राकेशसिंग परदेशी यांना निवेदन देण्यात आले.