आदिवासी बांधवांना मिळणार "रेमडेसिविर इंजेक्शन"चा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:16 AM2021-04-21T04:16:44+5:302021-04-21T04:16:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आदिवासी विकास विभागातर्फे आता कोरोना बाधित आदिवासी बांधवांना रेमडेसिविर इंजेक्शनचा खर्च उलपब्ध करून देण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आदिवासी विकास विभागातर्फे आता कोरोना बाधित आदिवासी बांधवांना रेमडेसिविर इंजेक्शनचा खर्च उलपब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा जळगावातील लोक संघर्ष समितीतर्फे स्वागत करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. दुसऱ्या लाटेने आदिवासी क्षेत्रातही आता शिरकाव केला आहे. शासकीय व खाजगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने राज्यातील अनुसूचित जमातींच्या नागरिकांना न्युक्लियस बजेट अंतर्गत रेमडेसिविर इंजेक्शनसाठी येणारा खर्च उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतला आहे.
कशी मिळणार मदत
खासगी रुग्णालयात दाखल आदिवासी कोरोना बाधित रुग्णाला जर रेमडेसिविर इंजेक्शनची गरज असेल तर त्याला तातडीने त्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून सदर निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठी रुग्ण हा खासगी रुग्णालयात दाखल हवा. तसेच सदर रुग्णालय हे महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणीकृत नसावे. रुग्ण हा अनुसूचित जमातीचा असावा तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा जास्त नसावे.
यांना मिळणार प्राधान्य
शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आदिम जमाती, दारिद्र्य रेषेखालील, विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, निराधार यांना आधी प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, शासनाने या योजनेची आता प्रत्यक्षात अंमलबजावणी करून आदिवासी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रतिभा शिंदे यांनी केली आहे.