आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण तात्पुरते स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:00 PM2019-09-11T22:00:28+5:302019-09-11T22:00:32+5:30
चोपडा : वसतिगृह प्रवेश प्रकरण
चोपडा : वसतिगृह प्रवेशाबाबत तसेच इतर मागण्यांसंदर्भात आदिवासी विद्यार्थ्यांनी येथील तहसीलसमोर उपोषण सुरू केले होते. विविध १२ मागण्यांपैकी वसतिगृह प्रवेशाच्या मागणीसंदर्भात जादा प्रवेशाचे लेखी आश्वासन संबंधित अधिकाऱ्यातर्फे मिळाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले.
११ रोजी दुपारी १२ वाजेपासून आदिवासी विद्यार्थी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषणाला बसले होते. तत्पूर्वी दुपारी शासकीय विश्रामगृहापासून हे विद्यार्थी मोर्चाने उपोषणस्थळी आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत कुणीही अधिकारी उपोषणकर्त्यांच्या भेटीला न आल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला होता.
@लेखी आश्वासनानंतर आवरला संताप
प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना जागा वाढवून प्रवेश दिला जाईल, या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. जिल्हाभरातील वसतिगृहातील विद्यार्थी संख्येचा आढावा घेतल्यानंतर इतर तालुक्यांतील रिक्त जागा चोपडा वसतिगृहाला वर्ग करण्यात येतील, असे लेखी आश्वासन सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही. डी. चौधरी यांनी दिले. त्यानंतर उपोषण रात्री ८.३० वाजता स्थगित करण्यात आले.
तालुक्यातील ६५ मुले, ६० मुली वसतिगृहात प्रवेशापासून वंचित आहेत. तसेच वसतिगृहातील शौचालय साफसफाई होत नाही. ती व्हावी, विद्यार्थ्यांना टॅलीचे प्रशिक्षण मिळावे, वैद्यकीय सेवा पुरवाव्यात, निर्वाह भत्ता तत्काळ दिला जावा आदी मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. याबाबत २६ आॅगस्ट आणि ५ सप्टेंबर रोजी लेखी निवेदन दिले होते व आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र अडचणी सोडविण्याचा प्रयत्न झाला नाही, असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅड.दारासिंग पावरा, उपाध्यक्ष सागर पावरा, गोपाळ सोनवणे, निलेश भालेराव, सचिव संजय पाडवी, युवा सचिव राजेश बारेला, चोपडा तालुकाध्यक्ष मिथुन पावरा, युवा तालुकाध्यक्ष विनेश पावरा, उपाध्यक्ष सचिन पावरा, कालुसिंग पावरा, रेहांजल बारेला, आदेश पावरा, महेंद्र पावरा, शरद पावरा, मुन्नी पावरा, सविता पावरा, संगीता पावरा, सुनिता पावरा यांच्यासह सुमारे ९० मुले व ४८ मुली उपोषणस बसले होते.