बोंडअळी नियंत्रणासाठी ‘ट्रायकोग्रामा’ कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:28 PM2019-01-16T13:28:54+5:302019-01-16T13:30:35+5:30
पीपीपी अंतर्गत खाजगी कंपनीशी करार
जळगाव : गुलाबी बोंडअळीवर नियंत्रणासाठी जैविक व्यवस्थापनांतर्गत ‘ट्रायकोग्रामा’ कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी निर्मल सीडस् पाचोरा यांना प्रयोगशाळा बळकटीकरणासाठी राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास सोमवार, १४ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी देण्यात आली.
जिल्ह्यात मागील वर्षी खरीप हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. रासायनिक किटकनाशकांची फवारणी करूनही उपयोग झाला नव्हता. त्यामुळे कपाशीचे पिक हातचे गेले होते. मात्र जैविक व्यवस्थापनांतर्गत निर्मल सीडस्ने तयार केलेले २५०० ट्रायकोग्रामा कार्ड शेतकऱ्यांना कृषी विभागाने वाटले होते. तेथे रासायनिक कीटकनाशकांची गरजच भासली नव्हती.
कृषी विज्ञान केंद्राकडे मात्र हे कार्ड नव्हते. त्यामुळे निर्मल सीडस्ने त्यांच्या प्रयोगशाळेच्या विस्तारीकरणासाठी राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत १ कोटी १४ लाखांचा प्रस्ताव दिला आहे. त्याचे सादरीकरण सोमवार, १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केले. तसेच पुढील वर्षी १ लाख कार्ड उपलब्ध करून देण्याचा दावा केला. हा प्रस्ताव राज्य समितीकडे पाठविण्यात आला आहे.
१२ हजाराचा खर्च ५०० रूपयांवर येणार
हे ‘ट्रायकोग्रामा’ कार्ड एकराला ५ वापरावे लागतात. त्यासाठी सुमारे ५०० रुपये खर्च येतो. त्यात ‘ट्रायकोग्रामा’ची अंडी असतात. ती फुटून त्यातून निघालेला जीव गुलाबी बोंडअळीच्या अंड्यातच अंडी घालतात. त्यामुळे बोंडअळीला आपोआप नियंत्रण बसते. रासायनिक किटकनाशकांच्या चार फवारण्या वाचतात. त्यासाठी एकरी सुमारे १२ हजारांपर्यंत खर्च येतो. तो खर्चही वाचणार आहे.