'आरटीपीसीआर' ची अट शिथिल करताच विमानाच्या प्रवासी संख्येचे तिपटीने उड्डाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:35+5:302021-06-06T04:13:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे आधीच विमानातील प्रवासी संख्या घटली असताना, त्यात 'आरटीपीसीआर' चाचणीच्या सक्तीमुळे अनेक प्रवाशांनी विमानसेवेकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे आधीच विमानातील प्रवासी संख्या घटली असताना, त्यात 'आरटीपीसीआर' चाचणीच्या सक्तीमुळे अनेक प्रवाशांनी विमानसेवेकडे पाठ फिरवली होती. मात्र, शासनाने १ जून पासून आरटीपीसीआरची अट उठविल्याने, विमानसेवेची प्रवासी संख्या तिपटीने वाढली आहे. शनिवारी जळगावहुन मुंबईला विमानाने ४१ प्रवाशी गेले असल्याचे विमान कंपनीने सांगितले. आरटीपीआर चाचणीची सक्ती बंद केल्यामुळेच दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच विमानाला जळगावहुन बऱ्यापैकी प्रवाशी मिळाले असल्याचे विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावरून अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणानांना निर्बंध घातले होते. यामध्ये सध्या जळगावला विमान सेवा पुरविणाऱ्या कंपनीचाही समावेश होता. तसेच राज्य शासनाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिका प्रशासनाने राज्यासह देशभरातून विमानाने मुंबईत येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'आरटीपीसीआर'चाचणी बंधनकारक केली होती. या मध्ये मुंबई विमानतळावरून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत होती. त्यामुळे भीती पोटी अनेकजण विमान प्रवास टाळत होते. यामुळे याचा विमानाच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला होता. विशेष म्हणजे आरटीपीसीआरच्या निर्णयामुळे जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या ७२ आसनी विमानात बोटावर मोजण्या इतकेच प्रवाशी मुंबईला जात होते.
इन्फो :
अन् प्रवासी संख्या झाली तिप्पट
राज्य शासनाने १ जून पासून लॉकडाऊन मधून काहीशी शिथिलता उठविल्यानंतर, मुंबई मनपा प्रशासनानेही विमान तळावरील 'आरटीपीसीआर' चाचणीचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयाचे प्रवाशांमधून स्वागत करण्यात येत आहे.
इन्फो :
कोरोनामुळे विमानाच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला असतांना, त्यात आरटीपीसीआरच्या चाचणीमुळेही प्रवाशांची संख्या कमी झाली होती. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे मुंबई मनपाने आरटीपीसीआर चा निर्णय मागे घेतल्याने, तिकीट बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
अखिलेश सिंग, व्यवस्थापक, विमान कंपनी.