चोपडा-हातेड रस्त्यावर ट्रॉलाने कारला चिरडले, तिघे जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 03:40 PM2019-05-12T15:40:10+5:302019-05-12T15:42:37+5:30
एक गंभीर जखमी : भल्या पहाटेची दुर्घटना
चोपडा : अंकलेश्वर - बºहाणपूर महार्गावर पहाटे अकुलखेडा -हातेड दरम्यान कार व ट्रॉलाचा भीषण अपघात झाला. कारमधील तिघे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, १२ रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास अकुलखेडा जवळ चोपडा कडून जाणारी कार (क्रमांक एमएच- १४ सीएक्स ९०१३) ही चोपडा कडून शिरपूरकडे जात असतांना समोरून येणारा (एचआर- ५५ एन ४११०) या ट्रॉलाने धडक देत कारवर ट्राला चढवून देत कारचा अक्षरश: चेंदामेंदा केला. यात नामदेव गुलाब कोळी (मासरे) (३७) रा. मांजरोद ता शिरपूर, अनिल दशरथ जाधव (२२) बभळाज ता शिरपूर, किशोर गजानन बिºहाडे (३२) भाटपुरा ता. शिरपूर हे जागीच ठार झाले आहेत. तर सागर नरेंद्र पाटील (१९) अजनाड ता. शिरपूर हे गंभीर जखमी झाले. जखमीस उपजिल्हा रुग्णालयात आणून डॉ. सुरेश पाटील यांनी उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
सदर घटना घडली तेव्हा ‘लोकमत’ ची पेपर वाहतूक करणारी गाडी हातेड जात होती. त्यावरील मालक चालक सुनील पाटील यांनी ही माहिती वार्ताहर पी. आर. माळी व वार्ताहर संजय सोनवणे यांना कळविली असता दोघांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. तात्काळ शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, पोलीस नाईक संतोष पारधी, सुनील पाटील, सुनील कोळी, विलेश सोनवणे व मधुकर पवार यांनी घटनास्थळ गठीत त्याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने ट्रॉला बाजूला ढकलीत कारमधील चौघांना बाहेर काढले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर बडगुजर व उपजिल्हा रुग्णलयातील विच्छेदक प्रशांत पाटील या दोघांनी जखमी व मृतकांचे शव कारचा पत्रा कापून बाहेर काढले त्यात हे दोघे जखमी झालेत. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत जखमीस तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले.
दरम्यान तिघा मृतकांचे शव विच्छेदन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील व डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.