वर्दळीच्या रस्त्यावर भरणाऱ्या बाजारामुळे परेशानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:52+5:302021-06-30T04:11:52+5:30
वरणगाव, ता. भुसावळ : कोरोनामुळे येथील मंगळवारी भरणारा साप्ताहिक बाजार भरपूर वर्दळ असलेल्या बोदवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरविला जात आहे ...
वरणगाव, ता. भुसावळ : कोरोनामुळे येथील मंगळवारी भरणारा साप्ताहिक बाजार भरपूर वर्दळ असलेल्या बोदवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरविला जात आहे , त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, तो बाजार पूर्वीच्या नियोजित जागेवरच भरविण्याची मागणी करण्यात आली आहे.
पूर्वीपासून वरणगावसह आजूबाजूच्या खेड्या-पाड्यातील जनतेसाठी दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात जिल्हाभरातील व्यावसायिक आपली दुकाने थाटतात. हा बाजार रामपेठ भागात भोगावती नदीकाठी भरत असतो; परंतु कोविड परिस्थितीमुळे पूर्वीपासूनच्या नियोजित जागेवर भरविण्यास बंदी घातली गेली. त्यामुळे सर्व दुकानदार, व्यापारी, भाजीपाला विक्रेते, खाद्यपदार्थाची दुकाने यांसह सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते आपली दुकाने बस स्टॅण्ड भागातील भरमसाठ रहदारी असलेल्या बोदवड रस्त्यावर थाटत आहेत.
या ठिकाणी वरणगावसह आजूबाजूच्या खेड्या-पाड्यातील आठवड्याचा बाजार घेणारे नागरिक खरेदीसाठी एकत्र जमतात. परिणामी, या वर्दळीच्या रस्त्यावर पायी चालणेसुद्धा दुरापास्त होते.
तसेच वाहनांची सुरू असलेली वाहतूक व रस्त्यावरील खरेदी-विक्री करणाऱ्या ग्राहकांसह दुकानदारांची गर्दी यामुळे येथे भयंकर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच एकमेकांचा धक्काबुक्की होऊन बऱ्याचदा वाद होत आहेत व जो फिजिकल डिस्टंसिंगचा मूळ हेतू बाजूलाच राहतो. कोविडच्या नियमांचे पालन होत नाही.
तरी मंगळवारी भरणारा बाजार रामपेठ भागातील पूर्ववत जागेवर भरविण्याची मागणी सर्व विक्रेते, दुकानदारांसह नागरिकांनी केली आहे. याकडे नगर परिषदेसह संबंधित विभागाने लक्ष देऊन नागरिकांची समस्या सोडविण्याची एकमुखी मागणी करण्यात आली आहे.