नारळाने भरलेला ट्रक २० फूट खोल नाल्यात उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:11 AM2021-01-01T04:11:36+5:302021-01-01T04:11:36+5:30
जळगाव : पारोळ्याकडे भरधाव निघालेला नारळांनी भरलेला ट्रक म्हसावद-वावडदा दरम्यान असलेल्या २० फूट खोल कुरकुरे नाल्यात उलटल्याची घटना गुरूवारी ...
जळगाव : पारोळ्याकडे भरधाव निघालेला नारळांनी भरलेला ट्रक म्हसावद-वावडदा दरम्यान असलेल्या २० फूट खोल कुरकुरे नाल्यात उलटल्याची घटना गुरूवारी पहाटे घडली. या अपघातात चालक शेख बडेमिया शेख उदांत साहेबू (३०, रा़ विभारीतापाडू जि. कृष्णा, आंध्रप्रदेश) हा जागीच ठार झाला तर क्लिनर व्यंकटेश्वर राव हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचारा सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात अपघाताची नोंद केली आहे.
आंध्र प्रदेशातील रहिवासी असलेला चालक शेख बडेमिया हा नारळांनी भरलेला ए़पी़१६़टीई़४२८९ क्रमांकाचा ट्रक घेवून पारोळ्याच्या दिशेने बुधवारी रात्री येत होता. यावेळी त्याच्यासोबत क्लिनर व्यंकटेश्वर राव ट्रकमध्ये होता़ दरम्यान, गुरूवारी पहाटे हा भरधाव ट्रक म्हसावद-वावडदा दरम्यानात असलेल्या कुरकुरे नाल्याच्या पुलाचे कठडे उडवित चक्क वीस फूट खोल नाल्यात जावून उलटला.
ट्रकचा पत्रा कापून दोघांना काढले बाहेर
गुरूवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास एका दुचाकीस्वाराने वावडदा येथील पोलीस पाटील विनोद गोपाळ यांना कुरकुरे नाल्यात ट्रक उलटला असल्याची माहिती दिली. विनोद यांनी लागलीच काही ग्रामस्थांना सोबत घेवून घटनास्थळ गाठले़ चालक व क्लिनर दोघेही ट्रकमध्ये अडकल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी लागलीच गॅस कटरच्या सहाय्याने ट्रकचा पत्रा कापून दोघांना बाहेर काढून लागलीच जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
चालक जागीच ठार
ट्रक नाल्यात उलटल्यानंतर चालक शेख बडेमिया हा जागीच ठार झाला होता. क्लिनर व्यंकटेश्वर राव हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, मयत ट्रकचालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जागोजागी नारळ पडलेले
हा नाला कोरडा होता. त्यामुळे ट्रक नाल्यात पडताच, पोत्यात भरलेले नारळ ट्रकच्या आजू-बाजूला पडलेले होते. विशेष म्हणजे ट्रकचे चाक देखील तुटले होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पारोळ्यात ज्यांच्याकडे नारळ पोहचविले जाणार होते. ते देखील अपघातस्थळी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.