कपाशीच्या गाठी भरलेला ट्रक पलटी होऊन क्लीनर ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 14:32 IST2021-01-02T14:31:35+5:302021-01-02T14:32:18+5:30
दहा टायर ट्रक धरणगाव एरंडोल रस्त्यावर टोळी गावानजीक पलटी होऊन क्लीनर लायक युनूस पिंजारी (३०, कटकर गल्ली, एरंडोल) हा ट्रकखाली दाबला जाऊन जागीच ठार झाला.

कपाशीच्या गाठी भरलेला ट्रक पलटी होऊन क्लीनर ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडोल : चोपडाहून कपाशीच्या गाठी भरून व्हाया एरंडोल सेलवाससाठी जाणारा दहा टायर ट्रक धरणगाव एरंडोल रस्त्यावर टोळी गावानजीक पलटी होऊन क्लीनर लायक युनूस पिंजारी (३०, कटकर गल्ली, एरंडोल) हा ट्रकखाली दाबला जाऊन जागीच ठार झाला.
ट्रकचालक मनोज श्रावण मराठे व ट्रकमालक हितेंद्र परदेशी हे दोघे जखमी झाले. ही दुर्घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास टोळी गावानजीक असलेल्या खाजगी रोपवाटिकानजीक घडली.
एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल येथील एम एच १९ झेड ३५९५ क्रमांकाचा दहाचाकी ट्रक चोपडा येथून कपाशीची गाठी भरून धरणगावमार्गे येत होता. टोळी गावापासून थोड्या अंतरावरील रोपवाटिकेजवळ समोरून आलेल्या ट्रकने कट मारला असता कपाशीच्या गाठी भरलेल्या ट्रकचालक त्याचा ट्रक वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याखाली उतरवला व त्यात ट्रक पलटी झाला. त्यात ट्रक मधील क्लिनर लायक युनुस पिंजारी हा ट्रक खाली दाबला जाऊन जागीच ठार झाला तर ट्रकचालक मनोज श्रावण मराठे व ट्रक मालक हितेंद्र परदेशी हे दोघे जखमी झाले. जखमींवर एरंडोल येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३०४अ, २७९, ३३७, ३३८प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विकास देशमुख, राजू पाटील, संदीप सातपुते हे पुढील तपास करीत आहेत.