स्टेअरिंग लॉक झाल्याने ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:20+5:302021-06-05T04:12:20+5:30
जळगाव : नागपूर येथून नवापूरकडे जाणाऱ्या ट्रकचे स्टेअरिंग लॉक झाल्याने तो पलटी झाला. यात चालक गंभीर जखमी झाला. हा ...
जळगाव : नागपूर येथून नवापूरकडे जाणाऱ्या ट्रकचे स्टेअरिंग लॉक झाल्याने तो पलटी झाला. यात चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात खोटेनगरजवळ गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत ट्रकचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नागपूर येथील ट्रक क्र.एमएच.०६.एसी.८९५५ चा चालक विकास धल (रा.ओडीसा) हा कापडांचे धागे घेऊन भरधाव नवापूरच्या दिशेने जात होता. गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास जळगाव शहरातील खोटेनगर स्टॉपजवळून जात असताना ट्रकचे स्टेअरिंग अचानक लॉक झाले अन् दुसऱ्याच क्षणी रस्त्याच्या कडेला ट्रक उलटला. यात चालक विकास धल हा गंभीर जखमी झाला. याच ट्रकच्या मागे त्याच कंपनीचा ट्रक चालत होता. त्यातील चालकाने व नागरिकांनी लागलीच जखमी विकास यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर, तालुका पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, या अपघातात ट्रकच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.