साकेगाव येथील वाघूर नदीच्या पुलावर अडकला ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 03:23 PM2019-10-25T15:23:56+5:302019-10-25T15:25:29+5:30
साकेगाव राष्ट्रीय महामार्गावर वाघूर नदीच्या पुलाचे संरक्षण कठडे तोडत ट्रक चक्क अर्ध्यावर लटकला.
वासेफ पटेल
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव राष्ट्रीय महामार्गावर वाघूर नदीच्या पुलाचे संरक्षण कठडे तोडत ट्रक चक्क अर्ध्यावर लटकला. सुदैवाने यात जीवितहानी टळली. ही घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. याचा साकेगावजवळ वळण देऊन थेट वाघूर नदीवर मार्ग जोडण्यात आला आहे. सकाळी ढगाळ वातावरण अंधूक सूर्यप्रकाश व साखर झोपेमुळे ट्रकचालकाचा गाडीवरून ताबा सुटला. ट्रक क्रमांक जीजे-१५-एटी-०९६८ चक्क वाघूर नदीच्या संरक्षण कठड्यस फिल्म स्टाईल धडक देत सुमारे ५० फूट उंचीवरील पुलाचे जवळपास दहा कठडे तोडत ट्रक अर्धा पुलावर व व अर्धा खाली अशा पद्धतीने अडकला. चालकाने प्रसंगावधान राखत लगेच ट्रकमधून उडी घेत घटनास्थळावरून पसार झाला. सिनेस्टाईल झालेल्या घटनेमुळे अवजड ट्रक असूनसुद्धा मोठी दुर्घटना टळली. कोणतीही जीवित हानी झाली नाही. यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ असा प्रत्यय याठिकाणी आला.
अन्यथा मोठा अपघात घडला असता
सुदैवाने ट्रक कठड्यावर अडकला. दुर्दैवाने जर ट्रक वाघूर पात्रात पडला असता तर आधीच महामार्गावरून ५० फूट खोल व त्यातच महामार्ग कामासाठी नवीन पूल बांधणीसाठी पात्राच्या खाली आणखीन १० फूट खोल खड्डे करण्यात आले आहेत. त्याच्यात २० फुटांपर्यंतचे धारदार सळईचे फाउंडेशन तयार करण्यात आले आहे. नेमका त्याच ठिकाणी ट्रक अडकला होता. चुकून जर खाली पडला असता तर फाऊंडेशनच्या सळया संपूर्ण ट्रकमध्ये घुसल्या असत्या व ट्रकचे नट बोल्टही दिसले नसते. अशी घटना घडण्याची शक्यता होती.
वाहनांच्या लांब रांगा, वाहतूक ठप्प
दरम्यान, पहाटे घडलेल्या या घटनेमुळे वाघूर नदी पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या जवळपास तीन तीन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
महामार्ग पोलिसांनी केली वाहतूक सुरळीत
महामार्ग पोलीस एएसआय गुलाब मनोरे, हे.कॉ.युसुफ शेख, पो.ना.मिलिंद सोनवणे यांनी घटनास्थळी धाव देत सर्वप्रथम घटनास्थळावरून अपघातग्रस्त ट्रकला बाजूला केले. यानंतर आधी जळगावकडे जाणारी वाहतूक सोडली व काही वेळानंतर वाहतूक पूर्णत: सुरळीत झाली.
बघ्यांची गर्दी
वाघूर पुलावर ट्रक अडकल्याची वार्ता गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठत अडकलेला ट्रक पाण्यासाठी गर्दी केली होती.