जळगावात खोट्या कागदपत्राद्वारे विम्याची रक्कम लाटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:39 PM2018-07-11T12:39:57+5:302018-07-11T12:41:02+5:30
मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने विमा पॉलिसी
जळगाव : मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे खोटे कागदपत्र सादर करुन १० लाख ५६ हजार रुपयांची विमा पॉलिसी काढून ही रक्कम लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या राकेश गणेश रायचंदे (रा.जाखनी नगर, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली. दरम्यान, मयताची पत्नी व एजंट यांच्यासह पाच जणांचा समावेश आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुभेदार सरदार तडवी (रा.कुंड्यापाणी, ता.चोपडा) यांचा मृत्यू २७ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेला असताना मयताची पत्नी फातमा सुभेदार तडवी (रा.कुंड्यापाणी, ता.चोपडा), प्रतिक मेने, अजय राजपूत व अन्य दोघांनी सुभेदार तडवी हे २७ सप्टेंबर २०१३ रोजी मृत्यू झाल्याचे दाखवून त्यांच्या नावाने ४ हजार ८८९ रुपये मासिक हप्त्याची खासगी कंपनीची विमा पॉलिसी काढली. मृत्यू दाखला व अन्य कागदपत्रे बनावट सादर केले. मृत्यूचा लाभ म्हणून १० लाख ५६ हजार रुपयांचे प्रकरण सादर केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विमा कंपनीचे व्यवस्थापक हरीद्वार रामविलास सैनी (वय ३८, रा.भगवान नगर, जळगाव) यांनी अडावद पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरुन पत्नी फातमा हिच्यासह पाच जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
१० लाख ५६ हजाराची काढली विमा पॉलिसी
व्यवस्थापक सैनी यांनी माहिती अधिकारात काढलेले पुरावे पोलिसात सादर केले. त्यात सुभेदार यांच्या विमा पॉलिसीचा अर्ज, सुभेदार यांचे पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला,बिडगाव ग्रामपंचायतीचा मृत्यू दाखला, विमा तपासल्याचा अहवाल आदी कागदपत्रे सादर केली.
त्यानंतर पोलिसांनी पत्नी फातमा व अन्य तिघांना अटक केली होती. यातील पाचवा आरोपी राकेश रायचंदे हा फरार होता. तो जळगाव शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी हेडकॉन्स्टेबल शरद भालेराव, रामचंद्र बोरसे, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी व महेश पाटील यांचे पथक रवाना केले होते.
या पथकाने दुपारी जाखनी नगरातच त्याला घेरले. स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणल्यानंतर सायंकाळी अडावद पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक गजानन राठोड यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.