फैजपूर येथील ‘मधुकर’ला थकहमी पत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:06 AM2018-10-06T02:06:54+5:302018-10-06T02:08:12+5:30
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या ४० वर्षांपासून अखंड सुरू आहे. आर्थिक अडचणीमुळे ‘मसाका’ची चाके थांबायला नको म्हणून आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, चेअरमन शरद महाजन व्हाईस चेअरमन भागवत पाटील व सर्व संचालक यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले. यावर महसूल मंत्री पाटील यांनी सांगितले की, मधुकर सहकारी साखर कारखान्याला शासनाकडून थकहमी पत्र मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल व त्यासाठी मुख्यमंत्र्यांशीही तत्काळ बोलणी करेल आणि शासनाकडून कर्ज मिळवून देण्याचे आश्वसन दिले.
अटल महाकृषी शिबिरासाठी फैजपूर येथील जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात आले होते. तत्पूर्वी त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली. यावेळी संचालक नरेंद्र नारखेडे यांनी मधुकर कशी शासनाची बँकेचे कुठली ही देणी नाही त्यामुळे शासनाने ‘मधुकर’चा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व थक हमीचे पत्र द्यावे, अशी मागणी केली.
यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील, आ.संजय सावकारे, आ.स्मिता वाघ, आ.सुरेश भोळे, आ.उन्मेश पाटील, आ.चंद्रकांत सोनवणे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यासह मान्यवर उपस्थित होते.
महसूल मंत्री यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर कारखान्यासाठी एक चांगला आणि धाडसी निर्णय घेतला कि, साखर २९ रुपयांच्या खाली विकली जाणार नाही जेणेकरून जे साखरेचे भाव चढ उतार होत होते ते आता स्थिर झाले आहे. जेणेकरून याचा फायदा साखर कारखान्याला होणार आहे अन्यथा अनेक कारखाने बंद झाले असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मी मधुकर ला थकहमी पत्र देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगीतले.
यावेळी कामगार युनियनकडून अध्यक्ष किरण चौधरी व सदस्य यांनी २४ महिन्याचे थकीत पगारासदर्भात महसूल मंत्र्यांना निवेदन दिले.