नांदेडच्या ग्रामसभेत वाळू लिलावाच्या विषयावरुन ‘तू-तू .. मै-मै’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:39+5:302021-08-29T04:18:39+5:30
नांदेड, ता. धरणगाव : ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर येथील ग्रामपंचायतीची पहिलीच ग्रामसभा शुक्रवारी सरपंच पूनम अत्तरदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...
नांदेड, ता. धरणगाव : ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर येथील ग्रामपंचायतीची पहिलीच ग्रामसभा शुक्रवारी सरपंच पूनम अत्तरदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
ग्रामसभेत ग्रामसेवक सुनील भदाणे यांनी संबोधित करून अजेंड्यावरील विषय घेऊन ग्रामसभेस सुरुवात झाली. पहिलीच ग्रामसभा असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. मात्र येथील तापीपात्रातील वाळू गटाचा लिलाव करण्याचा ग्रामसभेचा ठराव करण्याच्या कारणावरून ग्रामसभेत ग्रामस्थ व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच ‘तू-तू .. मै-मै’ झाली. लिलावास काहींनी सक्त विरोध दर्शविला तर काहींनी सहमती दर्शवली.
लिलाव झाल्यास वाळू उपशामुळे विहीर व बोअरवेलींची पातळी खालावून पाण्याची समस्या बिकट होईल, असे सांगून काहींनी विरोध दर्शविला. वाळूच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची प्रचंड दुर्दशा होते. म्हणून नांदेड फाटा रस्ता व नांदेड साळवा रस्ता वगळून दुसऱ्या पर्यायी रस्त्याने वाहतूक करण्यास हरकत नाही, असेही काहींनी सुचविले. ग्रामस्थांनी केलेल्या सूचना तहसीलदारांपर्यंत पोहचवून नंतरच वाळू गटाच्या लिलावाबाबत निर्णय घेण्यात यावा, असे ठरले.
तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या कामाच्या कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता देणे, गावठाण चौकात व्यापारी संकुल बांधकामाबाबत चर्चा, प्रा. आ. केंद्राच्या बांधकामासाठी जागा मंजूर करणे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, प्रधानमंत्री आवास योजनेअंर्तगत ब यादीतील मंजूर झालेल्या घरकूल लाभार्थ्यांना स्वत:ची जागा नसल्याने त्यांना जागा उपलब्ध करून देणे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
आरोग्य केंद्राच्या नवीन सुसज्ज इमारतीच्या बांधकामासाठी पाठपुरावा करून निधी व जागा उपलब्ध करून दिल्याने जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे यांचे अभिनंदन करण्यात आले. ग्रामसभेस ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.