रावेर तालुक्यातील मंगरुळ आश्रमशाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांने केले विषप्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:54 PM2018-03-14T12:54:57+5:302018-03-14T12:54:57+5:30
जिल्हा रुग्णालयात उपचार
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ - रावेर तालुक्यातील कळमोदा येथील रहिवासी व मंगरुळ आश्रमशाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी नितेश विश्राम बारेला (१६) याने शेतात विष प्राशन केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या विद्यार्थ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या बाबत जिल्हा रुग्णालयात नितेशचे वडील विश्राम बारेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेशची सध्या दहावीची परीक्षा सुरू असून आज पेपर नसल्यामुळे तो घरीच होता. मंगळवारी दुपारी शेतात त्याने विष प्राशन केले. त्यानंतर तो घरी आला. त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला प्रथम खिरोदा व नंतर सावदा येथे रुग्णालयात नेले. मात्र तेथून जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यास जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. विष का प्राशन केले, याचे कारण मात्र समजू शकले नसल्याचे नितेशच्या वडिलांनी सांगितले.
नितेश हा रावेर तालुक्यातील मंगरुळ आश्रमशाळेचा विद्यार्थी असून तो तेथेच राहतो. मात्र सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने कळमोदा येथूनच तो खिरोदा परीक्षा केंद्रावर जातो. त्यात मंगळवारी परीक्षा नसल्याने तो घरीच होता. त्याचे आई-वडील शेती करतात व त्यास एक भाऊदेखील आहे.
दिवसभरात सहा जणांनी केले विषप्राशन
मंगळवारी दिवसभरात वेगवेगळ््या कारणांनी विष प्राशन केलेले सहा जण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यामध्ये नितेश बारेला याच्यासह सपना कृष्णा कोळी (२२, रा. वाकटुकी, ता. धरणगाव), संजय वाल्मीक अहिरे (५०, रा. सारोळा, ता. पाचोरा), पूजा गजानन सुरळकर (२२, रा. तिघ्रा, ता. मलकापूर, जि. बुलडाणा), बाळू राजू चौधरी (४०, रा. यावल), गोपाल लालसिंग गायकवाड (३८, रा. चिंचोली, ता. जामनेर) यांचा समावेश आहे. या सर्व जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.