तुका म्हणे विठो भरला सबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 09:09 PM2018-12-30T21:09:58+5:302018-12-30T21:10:48+5:30

अध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार केला तर प्रत्येक क्षण हा नवीन असतो

Tuka is full of words | तुका म्हणे विठो भरला सबाह्य

तुका म्हणे विठो भरला सबाह्य

googlenewsNext

२०१८ हे वर्ष संपलं आणि नवीन २०१९ हे वर्ष सुरू होणार. अध्यात्मिक दृष्टीकोनातून विचार केला तर प्रत्येक क्षण हा नवीन असतो आणि संतांनी प्रत्येक क्षणाला महत्व दिले आहे. संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठातील पहिल्याच अभंग बघा, ‘देवाचिये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधियेला’ ज्ञानोबांच्या या चिंतनानुसार माणूस हा एक क्षण जगतो, त्यामुळे त्यांनी क्षणाचे महत्व विषद केले आहे. संत तुकोबांनी देखील काळाबद्दल सावधान केले आहे.
आयुष्य खातो काळ सावधान !
आपले आयुष्य काळाच्या तोंडात आहे, काळ कधी ग्रासेल ते सांगता येत नाही. म्हणूनच तुकोबांंनी स्पष्ट शब्दात माणसांना सूचित केले आहे.
क्षणो- क्षणी हाचि करावा विचार ।
तरावया पार भवसिंधू ।।
प्रत्येक क्षणाचा विचार करावा आणि येणाऱ्या नवीन वर्षात एक संकल्प करावा की, माणसाच्या हातात काही नाही. या विश्वाचे उदरभरण करणाºया विश्वंभराला आठवावे. यासाठी संकल्प करु या! जेणे करुन आपल्या हातून चांगलेच होईल.
एकदा संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर भजन करीत होते. त्यावेळी एक विज्ञानाधिष्ठित, बुद्धीप्रामाण्यवादी सद्गृहस्थ महाराजांच्या समोर येऊन बसले. त्या सद्गृहस्थाने महाराजांना सांगितले की, ‘मला बरेच लोक सांगतात की, मला पडलेल्या एका प्रश्नाचे उत्तर तुम्हीच देऊ शकता. यावर महाराज नम्रपणे म्हणाले, ‘विचारा आपला प्रश्न काय आहे? त्या सद्गृहस्थाने प्रश्न विचारला ‘महाराज या जगात देव आहे का?’ यावर तुकोबांनी त्या सद्गृहस्थास सांगितले की, ‘आपण निवांत बसावे, तुमच्या या प्रश्नाचे उत्तर नक्की देतो, परंतु तुम्ही त्याआधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या’ आणि तुकोबांनी विणेच्या तारावर बोट ठेविले व खालील अभंग गायला सुरुवात केली.
‘चालें हे शरीर कोंणाचिये सत्ते।
कोण बोलवितें हरी विण।।१।।
देखली ऐकवी एक नारायण।
तयाचें भजन चुकों नको।।२।।
माणसाची देव चालवी अहंता।
मीची एक कर्ता म्हणोनिया ।।३।।
वृक्षाचेही पाने हाले त्याची सत्ता।
राहिली अहंता मग कोंठे ।।४।।
तुका म्हणे विठोे भरला सबाह्य।
उणें काय आहे चराचरी।।५।।३०६६।।
या अभंगात संत तुकाराम महाराजांनी चारही वेदांचे सार सांगितले. या सद्गृहस्थाचे समाधान झाले व त्याला कळले की, चराचरात विठ्ठल भरलेले आहेत. या अभंगात संत तुकाराम महाराजांनी किती सरळ भाषेत वेदांत सांगितला. भोळ्या भाविकाला कळण्यासाठी तुकोबांची गाथा आहे. म्हणूनच या गाथेला ‘पंचमवेद’ असे म्हणतात. याचा सरळ अर्थ असा आहे की, हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते याचा शोध घ्या. देखणे- ऐकणे या क्रिया कोणाच्या सत्तेने चालतात. याचा शोध घ्या, वृक्षाचे पान सुद्धा ज्याच्या सत्तेने हलते ही सत्ता दुसरी तिसरी कोणी नसून मायबाप पांडुरंग- श्रीहरी- विठ्ठल आहेत. याची जाणीव आपोआप होते.
नववर्षानिमित्त आपणही तुकोबांच्या अभंगाचे चिंतन करावे. त्यामुळे आपोआप माणसाला समजते की, सर्व सृष्टी एका ईश्वरी सत्तेने चालत आहे. सर्व वाद, वितंडवाद, संशय सांडून श्रद्धा व भक्तीने विठ्ठलाचे भजन करावे, आपण सर्व समर्थ आहोत. श्री विठ्ठल समर्थ आहेत. असेच संत तुकाराम महाराजांना सांगायचे आहे.
- डॉ.कैलास पाटील, जळगाव.

Web Title: Tuka is full of words

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.