बेवारस समजून दफन केलेला मृतदेह उकरण्याची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:15 AM2021-05-30T04:15:11+5:302021-05-30T04:15:11+5:30

बोदवड : बेवारस समजून दफन केलेल्या मृतदेहास उकरण्याची वेळ पोलिसांवर आली. मृतदेह उकरल्यानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. तालुक्यातील नाडगाव ...

The turn to dig up a corpse buried in a state of indifference | बेवारस समजून दफन केलेला मृतदेह उकरण्याची पाळी

बेवारस समजून दफन केलेला मृतदेह उकरण्याची पाळी

googlenewsNext

बोदवड : बेवारस समजून दफन केलेल्या मृतदेहास उकरण्याची वेळ पोलिसांवर आली. मृतदेह उकरल्यानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

तालुक्यातील नाडगाव येथील ३५ वर्षीय तरुण गोकुळ किसन दौंडकर याची पत्नी अक्षयतृतीयेनिमित्त २६ रोजी माहेरी रिंगणगाव येथे गेलेली होती. पत्नीला घेण्यासाठी गोकुळ २७ रोजी मोटारसायकलीने निघाला, परंतु तो सासरवाडीलाही पोहोचला नाही, तसेच रात्रीही संपर्क झाला नाही. त्यामुळे गोकुळचे नातेवाईक हरवल्याची नोंद करण्यासाठी दि. २८ रोजी अकराला सकाळी पोलीस ठाण्यात आले.

मोबाइलमध्ये दाखविले फोटो

पोलीस ठाण्यात पोलिसांना मोबाइलमध्ये फोटो दाखविले. यावर संबंधिताचा पासपोर्ट फोटो आणा व सायंकाळी चार वाजता या, असे पोलिसांनी सांगितले. यानंतर, चार वाजता परत नातेवाईक पोलीस ठाण्यात आले व त्यांनी फोटो दाखविले. यावर पोलिसांनी मयत बेवारस व्यक्तीचे वर्णन व कपडे दाखविले, तसेच अंगावरील खूण एका पायाचे बोट नसल्याचे सांगताच, मयताच्या नातलगांना ओळख पटली. मरणाचे कारण व त्यांनी मृतदेह मागितला असता, त्यावर दफन विधी झाल्याचे सांगितल्याने नातलगांनी दुसऱ्या दिवशी २९ रोजी बोदवड पोलीस ठाण्याजवळ जाऊन आपली संतप्त भावना व्यक्त केली.

मोबाइल व दुचाकीही नाही

जेव्हा हरवल्याची नोंद करायला आलो होतो, तेव्हाच मयताला दाखविले असते, तर आज आमच्यावर हा प्रसंग ओढावला नसता, तसेच त्याचा मोबाइल व दुचाकीची मागणी केली असता, दुचाकी व मोबाइलही सोबत नसल्याचे सांगितले. मोबाइल व दुचाकी नसल्याने काही घातपात तर नाही ना, असा संशयही नातेवाइकांनी व्यक्त केला.

तहसीलदारांच्या उपस्थितीत उकरला मृतदेह

या घटनाक्रमानंतर दफन केलेला मृतदेह तहसीलदार प्रथमेश घोलप, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल गिरी व पोलीस पथकाच्या उपस्थितीत उकरण्यात आला. मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेत, सामाजिक रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. मृत्यू झालेल्या गोकुळ दौंडकर याच्यापश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी व एक वर्षाचा मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

... तर अडचणी वाढल्या नसत्या-प्रकाश दौंडकर

हरवल्याची नोंद करण्यासाठी पोलिसात गेलो असता, तेव्हाच जर पोलिसांनी दखल घेतली असती किंवा बेवारस मृतदेह आढळल्याची माहिती तलाठी, पोलीस पाटील यांना दिली असती, तर आमच्या अडचणी वाढल्या नसत्या, असा आरोप मयताचा भाऊ प्रकाश किसन दौंडकर यांनी केला आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी, यासाठी आमदार, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले,

Web Title: The turn to dig up a corpse buried in a state of indifference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.