कर्ज वसुली बंद करा, वीज पुरवठा कापू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:37 AM2019-03-09T11:37:07+5:302019-03-09T11:37:49+5:30
पालकमंत्री चंंद्रकांत पाटील यांचे आदेश
जळगाव : टंचाई स्थिती लक्षात घेता कर्ज वसुली तात्काळ थांबवावी तसेच पाणी योजनांकडे थकबाकी असली तरी वीज पुरवठा बंद करू नये, असे स्पष्ट आदेश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत दिले.
अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आढावा बैठक झाली. यासस जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वनविभागाचे मोराणकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
कर्ज वसुली तातडीने थांबवावी
बैठकीत टंचाईची स्थिती लक्षात घेऊन जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता एस.बी.नरवाडे यांच्याकडून पालकमंत्र्यांनी योजना निहाय माहिती घेतली. पालकमंत्री म्हणाले की, वीजबिल न भरल्यामुळे एकही पाणीपुरवठा योजना बंद करु नये. शेतकऱ्यांकडील कर्जवसुली तातडीने थांबवावी. दुष्काळी भागासाठी पाण्याचे नवीन स्त्रोत शोधून ते कार्यान्वित करावे. नागरिकांना टँकरद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची शुध्दताही तपासण्याबरोबरच भविष्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घ्यावा, यासाठी जिल्हाधिकारी यांनी दर आठवड्याला बैठक घेण्याची सुचनाही पालकमंत्र्यांनी दिली.
३६ कोटींच्या आराखड्यावर चर्चा
या बैठकीत सध्या जिल्ह्यातील दुष्काळी भागातील १००३ गावांसाठी सुचविण्यात आलेल्या १६२० उपायोजनांसाठी तयार करण्यात आलेल्या ३६.२४ कोटी रुपयांच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली. सध्या जिल्ह्यात ६९ गावांसाठी ४७ टँकर सुरु असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.