तिकीट तपासणीमुळे रेल्वे स्थानकात अवैधरित्या प्रवेश बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 04:44 PM2019-05-11T16:44:15+5:302019-05-11T16:45:05+5:30
रेल्वे फलाटांवर अवैधरित्या प्रवेश रोखण्यासाठी व प्रवाशांमध्ये जागरुकता वाढावी या उद्देशाने रेल्वे प्रशासनातर्फे दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर फलाट तिकिटांची तपासणी करण्यात आली. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे फलाटांवर अवैधरित्या प्रवेश रोखण्यासाठी व प्रवाशांमध्ये जागरुकता वाढावी या उद्देशाने रेल्वे प्रशासनातर्फे दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर फलाट तिकिटांची तपासणी करण्यात आली. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकावर देशाच्या कानाकोपऱ्यातून गाड्या ये-जा करतात. हजारोंच्या संख्येने प्रवासी स्थानकांमध्ये येत असतात. स्थानकामध्ये अवैधरित्या प्रवेश करणाऱ्यांवर आळा बसावा व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांमध्ये जागरूकता मोहीम म्हणून दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर (तिकिटिंग एरिया) फलाटांच्या तिकिटांची तपासणी मुख्य वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक नीलेश बाथो, मुख्य तिकीट निरीक्षक बी.एस.महाजन, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी वसीम शेख, इम्रानखान यांच्या पथकाने शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत केली. यावेळी अवैधरित्या तिकीट न काढता फलाटमध्ये प्रवेश करणाºया प्रवाशांना समजूत घालून तिकीट काढण्याच्या सूचना करण्यात आल्या.
उत्पन्नात वाढ
गतवर्षी याच महिन्यांमध्ये पहिल्या १० दिवसात सुमारे ८०० ते ९०० फलाट तिकीट काढण्यात आले होते. हा आकडा वाढून आता १४०० ते १५०० दरम्यान गेला आहे. फलाटाच्या प्रति तिकीट मागे १० रुपये आकारले जातात. फलाट तिकीट न घेतल्यास २५० रुपये दंडाची तरतूद आहे. या मोहिमेमुळे रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
दरम्यान, फलाट तिकीट तपासणीची मोहीम सातत्याने सुरूच राहणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.