जळगाव कृउबातील दीड कोटी रुपयांची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:28+5:302021-07-07T04:20:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कडधान्य साठ्यावर मर्यादा आणत केंद्र सरकारने नवीन बंधने लादल्याच्या निषेधार्थ सोमवार, ५ जुलै रोजी ...

Turnover of Rs 1.5 crore in Jalgaon Kruuba stalled | जळगाव कृउबातील दीड कोटी रुपयांची उलाढाल ठप्प

जळगाव कृउबातील दीड कोटी रुपयांची उलाढाल ठप्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कडधान्य साठ्यावर मर्यादा आणत केंद्र सरकारने नवीन बंधने लादल्याच्या निषेधार्थ सोमवार, ५ जुलै रोजी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उपबाजार समितीमधील धान्याचे व्यवहार बंद ठेवण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. यामध्ये एकट्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दीड कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. बंदमुळे बाजार समितीमध्ये शुकशुकाट होता तर व्यापाऱ्यांनी ऑनलाईन बैठका घेत पुढील नियोजनाबाबत चर्चा केली. दरम्यान,व्यापाऱ्यांच्या या बंदला आडत्यांनीही पाठिंबा दिला.

धान्य, कडधान्य साठवणूक विषयी केंद्र सरकारने अचानक बंधने लागू करीत २ जुलै रोजी तसा अद्यादेश काढला व त्याची अंमलबजावणी तातडीने केली. या अद्यादेशानुसार ठोक (होलसेल) विक्रेत्यांना २०० मेट्रीक टन तर किरकोळ विक्रेत्यांना पाच मेट्रीक टनपर्यंत साठा करता येणार आहे. या बंधनाच्या निषेधार्थ बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी सोमवारी धान्य खरेदी बंद ठेवली.

सर्व व्यवहार थांबले

व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंदचा निर्णय घेतल्याने सोमवारी बाजार समितीमध्ये खरेदी-विक्रीचे कोणतेच व्यवहार होऊ शकले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निदर्शने अथवा इतर आंदोलन न करता १५० व्यापाऱ्यांनी केवळ बंद ठेवत हा निषेध नोंदविला. त्यामुळे बाजार समितीमध्ये लिलाव, मोजमाप ठप्प होऊन एकट्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांची जवळपास दीड कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली.

आडत्यांचा पाठिंबा

जळगाव मार्केट यार्ड असोसिएशनने पुकारलेल्या या बंदला बाजार समितीमधील आडत्यांनीही पाठिंबा दिला. त्यांनीही सोमवारी बंद पाळला. यामुळे बाजार समितीमध्ये शुकशुकाट होता. दुसरीकडे व्यापारी बांधवांनी ऑनलाईन बैठका घेत सरकारच्या या निर्णयाविषयी पुढील धोरण ठरविण्यासाठी चर्चा केली.

सरकारचा हा निर्णय शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हिताविरुद्ध असून यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होणार असल्याचे मार्केट यार्ड असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत बियाणी, कार्याध्यक्ष अशोक राठी यांनी सांगितले.

Web Title: Turnover of Rs 1.5 crore in Jalgaon Kruuba stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.