पाण्याच्या बाबतीत बारा महिने अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:53 PM2019-05-31T12:53:34+5:302019-05-31T12:53:59+5:30
विकासाच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही़
आसोदा हे गाव जळगावच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे़ मात्र, येथे विकासाच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही़ वर्षानुवर्षे झाली मात्र, आजपर्यंत एकही ग्रामपंचायत ग्रामस्थांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देऊ शकलेली नाही ही मोठी शोकांतिका आहे़ उन्हाळ्यात दूषित, पावसाळ्यात गढूळ, हिवाळ्यात टंचाई, असे बाराही महिने पाण्याच्या अडचणींचा ग्रामस्थांना सामना करावा लागतो़ कोणालाच याचे सोयरसुतक नाही़ कोणीही लक्ष द्यायला तयार नाही़ एवढ्या मोठ्या गावासाठी अगदी छोटी पाणीपुरवठा योजना निवडण्यात आल्याने गाव पुन्हा ५० वर्ष मागे गेलेले आहे़ प्रशासनाची व पदाधिकाऱ्यांची ग्रामस्थांना आता किव येतेय की, ते पाणी टंचाईवर काहीही करू शकत नाही. उन्हाळ्यात जनस्त्रोत आटून पाणी टंचाईची समस्या उद्भवणे हे नैसर्गिक आहे़ पाऊस कमी पडल्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणे हे ही नैसर्गिक आहे़ मात्र, गावा शेजारी पाणी असताना ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याचा प्रकार म्हणजे भयावह आहे़ स्थानिक प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव, कुठलेली नियंत्रण नसणे, याची प्रचिती म्हणजे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण होय़ अनेक भागात आजही अशा कृत्रिम पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे़ पाणी टंचाईचे फटके अगदी सर्वांनाच सहन करावे लागत आहे़ यात वृद्ध व दिव्यांगांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात़ टंचाईबाबत नियोजन नसल्यामुळे पाण्यासाठीची ही वणवण अधिकच वाढली आहे़ अशा स्थितीत स्वच्छ भारत अभियानाचाही गावात बोजवारा उडाला आहे़ कारण पाण्याअभावी शौचालयांचा वापर हा पूर्णत: थांबलेला आहे़ हा मुद्दाही गंभीर आहे, मात्र त्या गांभिर्याने गावाच्या या समस्येकडे बघायला कोणीही तयार नाही़
-किशोर चौधरी, पाणी टंचाई निवारण समिती समन्वयक