लेखापरीक्षण नसलेल्या वीस ग्रामपंचायती रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:48+5:302021-02-26T04:22:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या चार वर्षांपासून लेखापरीक्षण न करणाऱ्या जिल्ह्यातील वीस ग्रामपंचायतींचा लेखाजोखा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या चार वर्षांपासून लेखापरीक्षण न करणाऱ्या जिल्ह्यातील वीस ग्रामपंचायतींचा लेखाजोखा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मागविला असून लवकरच संबंधित विस्तार अधिकारी व संबंधितांना नोटीस बजावून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात अनेक मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ग्रामपंचायतीचे दरवर्षी लेखापरीक्षण करून निधी व खर्चाबाबत माहिती द्यावी लागते. मात्र, गंभीर बाब म्हणजे वीस ग्रामपंचायतींनी चार वर्षे लेखापरीक्षणच झालेले नसल्याची माहिती आता ग्रामपंचायत विभागाकडून समोर आली आहे. खर्च व निधी यांचा ताळमेळ योग्य निधी खर्च झाला आहे का? या बाबी यातून समोर येतात. यात वित्त आयोगाचा मोठा निधी दरवर्षी येत असल्याने त्याचा विनियोग नेमका कोणत्या मार्गे होत आहे. तेही समोर येत असते. अनेक ग्रामपंचायतींमध्ये लेखापरीक्षणात मोठमोठे अपहार समोर आले आहेत. त्यामुळे लेखापरीक्षण दरवर्षी अत्यावश्यक असते.
अचानक तपासणी
संबंधित ग्रामपंचायतींबाबत माहिती मागविल्यानंतर आता कोणत्याही तालुक्यांमध्ये अचानक भेटी देऊन तपासणी करण्याचे अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. या तपासणीनंतर कारवाई केली जाणार आहे.
या ग्रा.पं.वर आता करडी नजर
भुसावळ : वराडसीम, शिंदी, पिंपळगाव खु. किन्ही, दर्यापूर
धरणगाव : दोनगाव बु., दोनगाव खु., झुरखेडा
जळगाव : नशिराबाद, आसोदा, म्हसावद, भोलाणे, शेलगाव, नंदगाव, विदगाव
पाचोरा : रामेश्वर, तारखेडा बु., गाळण बु., विष्णुनगर, पुगाव