भुसावळ येथे खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:23 AM2018-10-06T01:23:27+5:302018-10-06T01:24:09+5:30
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने खुनाच्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात अटक वारंट काढूनही न्यायालयात हजर न राहणाऱ्या दोन आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
भुसावळ, जि.जळगाव : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने खुनाच्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात अटक वारंट काढूनही न्यायालयात हजर न राहणाऱ्या दोन आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड व पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई शुक्रवारी करण्यात आलीे.
संशयित आरोपी शेख हमीद शेख शमशोद्दीन याच्याविरुद्ध येथील न्यायालयात खासगी फौजदारी खटला क्रमांक ३२८/१४, भादंवि कलम ३०२, १२० ब प्रमाणे खटला सुरू आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी शेख हमीद हा न्यायालयात हजर राहत नव्हता. यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे या आरोपीस अटक करण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार यांनी सहायक फौजदार तसलीम पठाण, शेख गुलबक्षी तडवी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण, राहुल चौधरी, सचिन चौधरी, उमाकांत पाटील, योगेश माळी आदींचे पथक नेमले होते. या पथकाने आरोपी शेख हमीद यास खडका चौफुली येथून ताब्यात घेतले.
तर दुसरा आरोपी पिरा उर्फ आकाश श्याम जाधव (वय २८) याच्याविरुद्ध येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला क्रमांक २७/२०१६, भादंवि कलम ३०२ प्रमाणे खटला दाखल आहे. या खटल्यात संशयित आरोपी जाधव हा फरार असल्यामुळे त्याच्याविरुद्धही न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. जाधव यास पोलीस पथकाने वाल्मीक नगर येथे त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.