अडीचपट रुग्णवाढीसोबत निर्बंधांचा कालावधीही वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:15 AM2021-03-07T04:15:27+5:302021-03-07T04:15:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाभरात लावण्यात आलेले निर्बंध आता १५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता दोन आठवड्यांपूर्वी जिल्हाभरात लावण्यात आलेले निर्बंध आता १५ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. दोन आठवड्यात रुग्ण संख्या कमी न होता ती उलट अडीचपटीने वाढल्याने निर्बंधांचाही कालावधी वाढविण्यात आला आहे. अजूनही गर्दीचे प्रमाण कमी होत नसल्याने कडक निर्बंधाकडे वाटचाल होण्याचीही शक्यता आहे. वाढविण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या दरम्यान असणाऱ्या परीक्षा घेण्यास सूट देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील आठवडे बाजार पुन्हा एकदा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी जारी करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शनिवार, ६ मार्च रोजी दिले. दरम्यान, १५ मार्चपर्यंत निर्बध कायम असल्याने ११ मार्च रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीवरही कोरोनाचे सावट राहणार आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांना वेग देत कारवाईचे सत्र सुरू केले होते. तरीही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने २२ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात अनेक निर्बंध लावण्यात आले.
निर्बंधानंतरही वाढली रुग्णसंख्या
कोरोनाची साखळी खंडित होऊन संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध घालण्यात आले खरे. मात्र निर्बंध घालण्यात आलेले शाळा, महाविद्यालय इतर ठिकाणी प्रवेश अथवा संचार नसला तरी बाजारपेठ, बसस्थानक अशा अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी कमी होत नसून अनेक जण मास्कचा वापर न करणे व इतरही नियमांचे पालन करीत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याचे चित्र आहे. २२ मार्च निर्बंध घातले त्यादिवशी जिल्ह्यात ३१९ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ही संख्या वाढत जाऊन ४००, ५०० च्या पुढे गेली व ५ मार्च रोजी तर थेट ७७२ रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंधांचा कालावधीही वाढणार असल्याचे मानले जात होते. त्यानुसार अखेर १५ मार्चपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे.
आकडे दाखवितात गांभीर्य व निर्बंध मर्यादावाढीचे कारण
दिनांक जिल्ह्यातील रुग्णसंख्या
२२ फेब्रुवारी ३१९
२३ फेब्रुवारी ३६८
२८ फेब्रुवारी ४०८
२ मार्च ४९२
४ मार्च ५४८
५ मार्च ७७२
दहावी, बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर वर्ग सुरू करण्याविषयी नवे आदेश
इयत्ता दहावी, बारावी व महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सदर वर्ग सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील रुग्णसंख्या विचारात घेऊन त्या-त्या वेळेस नव्याने आदेश देण्यात येतील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.