डंपरने दिली प्रांताच्या गाडीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 09:41 PM2021-02-25T21:41:29+5:302021-02-25T21:42:28+5:30
वाळूमाफियांची मुजोरी वाढली : न्हावीची घटना, पाठलाग होत असताना वाहन नेले सुसाट
य वल/ फैजपूर : गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांची मुजोरी मोठ्या प्रमाणावर वाढली असून वाळूमाफियांचा पाठलाग करणारे फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या शासकीय वाहनाला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. ही घटना २४ रोजी रात्री न्हावी तालुका यावल गावात घडली.डंपरसह पळून जाण्याच्या प्रयत्नात ही धडक दिली. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे चालक उमेश तळेकर यांना मुका मार लागला आहे, तसेच वाहनाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बेकायदा वाळू वाहतुकीची माहिती मिळाल्याने प्रांताधिकारी कैलास कडलक हे किनगाव तालुका यावलपर्यंत गेले होते व तेथून परतत असताना न्हावी गावाकडे एक डंपर (एम एच१९-झेड ४७४९) जात असताना या डंपरचा प्रांताधिकारी यांनी पाठलाग केला. तेव्हा हा डंपर सुसाट वेगाने जाऊन न्हावी ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील अरुंद गल्लीत शिरला व पळून जाण्याच्या प्रयत्नात या डंपरने प्रांताधिकारी कडलक यांच्या शासकीय वाहनाला (एम एच१९ एम०७०८) जोरदार धडक दिली. यावेळी एमएच १९बी-एल १०१० वरील चालक-मालक ज्ञानेश्वर नामदेव कोळी रा. कोळन्हावी याने या प्रकाराला साथ दिली, तसेच त्याचे सोबतचा अर्जुन बाविस्कर रा. पुनगाव ता. चोपडा, चंद्रकांत सोळुंके रा. कोळन्हावी यांच्याविरुद्ध प्रांताधिकारी यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी डंपरसह महागडी चारचाकी जप्त केली असून तपास सपोनि प्रकाश वानखडे, फौजदार रोहिदास ठोंबरे व सहकारी करीत आहेत.महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनमाफियांवर कारवाई करण्यासाठी पाठलाग करणाऱ्या प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्या वाहनावर वाळूमाफियांनी धडक देत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने या घटनेचा महसूल कर्मचारी संघटनांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला व एक दिवसासाठी कामकाज बंद ठेवले. यावेळी सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक व फैजपूर डीवायएसपी यांच्याकडे निवेदनाद्वारे काढण्यात आली असून यावल तहसीलदार महेंद्र पवार व रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होते.डंपर चालकास अटकया घटनेप्रकरणी प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी तक्रार दिली असून, या तक्रारीवरून डंपर चालक महेंद्र धनराज तायडे यांच्यासह चौघांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. डंपर चालक महेंद्र तायडे याला अटक करण्यात आली असून डंपरसह एक महागडे चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.