एटीएममध्ये पैस भरल्याचे भासवून ६४ लाखांवर डल्ला मारणा-या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:29 AM2021-02-06T04:29:03+5:302021-02-06T04:29:03+5:30
जळगाव : एटीएममध्ये पैसे भरणा-या कंपनीच्या कर्मचा-यांनी एटीएममध्ये पैसे भरल्याचे भासवून सुमारे ६४ लाख ७० हजार ७०० रूपये हडप ...
जळगाव : एटीएममध्ये पैसे भरणा-या कंपनीच्या कर्मचा-यांनी एटीएममध्ये पैसे भरल्याचे भासवून सुमारे ६४ लाख ७० हजार ७०० रूपये हडप केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रोशन बाळासाहेब अहेर (२८, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, नाशिक) व महेश शंकरराव सानप (४२, रा.चाळीसगाव) यांना अटक केली आहे. दोघांना ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य मोरक्या सुदीप नारायण रमाणी हा फरार आहे.
२०१६ मध्ये विविध एटीएममध्ये भरणा करण्यासाठी ईपीएस कंपनीला ठेका दिला होता. ईपीएस कंपनीने हा उपठेका आरसीआय कंपनीला दिला होता. त्यामुळे या कंपनीचे कर्मचारी विविध बँकांच्या एटीएममध्ये भरणा करायचे. आरसीआयचे सुदीप नाराण रमाणी, रोशन अहेर व महेश सानप यांनी २०१६ मध्ये एटीएममध्ये पैस भरल्याचे भासवून मेहूणबारे येथील आयडीबाय बँकेच्या एटीएममधून १ लाख ६८ हजार १०० रूपये तसेच तामसवाडी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएममधून १ लाख ७९ हजार २०० रूपये व उंबरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएममधून ६ लाख ९ हजार ९००, टाकळी प्र.दे.येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएममधून २ लाख ६३ हजार ६०० रूपये व दहीवद येथील एसबीआय बँकेच्या एटीएममधून ३१ लाख १८ हजार रूपयांचा अपहार केला होता. याप्रकरणी दीपक तिवारी यांच्या फिर्यादीवरून भडगाव, पाचोरा, चाळीसगाव शहर व चाळीसगाव ग्रामीण व पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मेहुणबारच्या गुन्ह्यात अटक
पारोळा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात रोशन अहेर व महेश सानप यांना अटक करण्यात आली होती. नुकतेच आता आर्थिक गुन्हे शाखेने मेहूणबारे येथील गुन्ह्यात अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक अनिस शेख, वाल्मीक वाघ, मसुद शेख, नितीन सपकाळे, भरत जेठवे आदींनी केली आहे.