शिव कॉलनी स्टॉपवरील एटीएम फोडणाऱ्या दोघांना हरियाणातून घेतले ताब्यात ; मुख्य संशयित अद्याप फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:01 PM2020-08-06T13:01:56+5:302020-08-06T13:02:06+5:30
जळगाव : शिव कॉलनी उड्डाणपुलाजवळील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडणाºया दोन जणांना हरियाणा पोलिसांनी पकडले असून या दोघांना ताब्यात घेण्याच्या ...
जळगाव : शिव कॉलनी उड्डाणपुलाजवळील स्टेट बॅँकेचे एटीएम फोडणाºया दोन जणांना हरियाणा पोलिसांनी पकडले असून या दोघांना ताब्यात घेण्याच्या दहा मिनिटे आधीच मुख्य संशयित फरार झाला आहे. दरम्यान, या दोघांना जळगाव पोलिसांनी फरीदाबादमधील निमका कारागृहातून हस्तांतर करुन ताब्यात घेऊन बुधवारी शहरात आणले.
निसार शफुर सैफी (३८) आणि त्याचा लहान भाऊ इरफान शफुर सैफी (२९, रा. पलवल, हरियाणा) अशी दोघांची नावे आहेत. यातील तिसरा मुख्य सुत्रधार खुर्शीद मदारी सैफी (रा.अंघोला ता.पलवल, हरियाणा) हा फरार आहे.
महामार्गाला लागून असलेले एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने कापून त्यातील १४ लाख ४१ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविल्याची घटना १२ जुलै रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
संशयित सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले होते. दरम्यान, गुन्हा घडल्यापासून जळगाव पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते. फुटेज व त्यांचे छायाचित्र व्हायरल करण्यात आले होते.
हरियाणा पोलिसांकडे त्यांनी जळगावात एटीएम फोडल्याची कबुली देवून साडे सात लाख रुपये देखील या दोघांनी काढून दिल्याचे सांगितले जात आहे,मात्र त्याला अधिकृत दुजोरा पोलिसांनी दिलेला नाही. हरियाणा पोलिसांनी जळगाव पोलिसांशी संपर्क साधून आरोपींची माहिती दिली. त्यानुसार जळगाव पोलिसांनी या दोघांना कारागृहातून ताब्यात घेतले.
खुर्शीदच्या शोधात फुटले बींग, रस्त्याने जाताना केली रेकी
1. खुर्शीद हा हरियाणा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तेथील पोलीस त्याच्या मागावर होते. खुर्शीद याच्या घरी जावून चौकशी केली असता तो निसार व इरफान या दोघं भावांसोबत कंटेनरवर कामाला गेल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांकडून पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे हरियाणा पोलीस त्याच्या मागावर होते. तांत्रिक माहितीच्या आधारावर खुर्शीदची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचला, मात्र त्याची कुणकुण लागल्याने तो या दोघांना सोडून निसटला. माहितीच्या आधारावर पोलिसांनी कंटेनर अडवून दोघांची चौकशी केली असता खुर्शीद हा दहा मिनिटापूर्वीच आमच्यातून गेल्याची माहिती या दोघांनी पोलिसांना दिली. तो फरार होण्यात यशस्वी झाल्याने पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता जळगाव शहरात तिघं मिळून एटीएम फोडल्याची कबुली दोघांनी दिली.
2. तिघं जण कोलकाता येथून मुंबईला जात असताना हे एटीएम फोडणे सहज शक्य असल्याने त्याचे नियोजन केले व परत मुंबई येथून कोलकाता जाताना १२ जुलैच्या मध्यरात्री त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून हेतू साध्य केला. यातील खुर्शीद हा सराईत असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत तर इरफान हा वेल्डींगचे काम करीत असल्याने त्याला त्याचे ज्ञान होते. त्यामुळे कुरशीदने हा सापळा रचला होता.