पीएफच्या पैशावर ऑनलाइन डल्ला मारणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:54+5:302021-06-16T04:21:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जैन इरिगेशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या पैशांवर ऑनलाइन डल्ला मारणाऱ्या आकाश नवनाथ पासलकर (वय २५, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जैन इरिगेशन कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या पैशांवर ऑनलाइन डल्ला मारणाऱ्या आकाश नवनाथ पासलकर (वय २५, रा. दौंड, जि. पुणे. ह.मु. टेमघर, ता. भिवंडी) व मोहम्मद मुजम्मील मोहम्मद मुस्तफा शेख (वय २७, रा.नवखट्टा, ता. तय्यबपूर, जि. किसनगंज, बिहार. ह.मु. राजोली गाव, भिवंडी) या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेले एटीएम कार्ड, स्टेट बँकेचे पासबुक, आधार कार्ड व रोख ८० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
जैन इरिगेशन कंपनीचे कर्मचारी हरिराम बन्सीलाल साहू व प्रल्हादन षण्मुगम यांच्या पीएफ खात्यात १६ जानेवारी २०१९ ते २० फेब्रुवारी २०१९ या काळात वेळोवेळी लॉगिंग करून त्याद्वारे पीएफ खात्याला लिंक असलेले बँक खाते व इतर माहितीची रिक्वेस्ट पाठवून साहू यांच्या खात्यातून ३० हजार रुपये तर प्रल्हादन यांच्या खात्यातून ५० हजार रुपये ऑनलाइन परस्पर वळविण्यात आले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघड झाल्यानंतर कंपनीचे वरिष्ठ पर्सनल मॅनेजर चंद्रकांत सुधाकर नाईक (वय ५५) यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून २८ मे रोजी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हा उघड
सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे व त्यांच्या पथकाने तंत्रज्ञानाचा वापर करून या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. या आरोपींची निश्चित माहिती व ठिकाण प्राप्त झाल्यानंतर उपनिरीक्षक अंगद नेमाणे, दिलीप चिंचोले, गौरव पाटील, दीपक सोनवणे व पंकज वराडे यांचे पथक भिवंडी, जि. ठाणे येथे धडकले. तेथे सर्वांत आधी आकाश याला ताब्यात घेण्यात आले, त्यानंतर मोहम्मद याला ताब्यात घेण्यात आले. दोघांना जळगावात आणल्यानंतर न्यायालयात हजर केले असता मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पोलीस कोठडीत असताना दोघांकडून अपहाराची ८० हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
कोट...
नागरिकांनी कोणत्याही अज्ञात व्यक्तीला स्वत:चे बँक व पीएफ खात्याची माहिती सांगू नये. शक्यतो कुठल्याही अनोळखी व्यक्तीसोबत ऑनलाइन व्यवहार करणे टाळावे व या व्यवहाराचे पासवर्ड नेहमी सुरक्षित ठेवून फसवणूक टाळावी.
- बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन
--