'इमर्जन्सी'साठी सहयोग क्रिटिकलला दोन बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:19 AM2021-01-16T04:19:41+5:302021-01-16T04:19:41+5:30
जळगाव : शिवाजीनगरातील डी.बी. जैन रुग्णालयात कोरोना लसीकरणाची प्रक्रिया पार पडणार असून, शहरात महापालिकेचे हे एकच केंद्र असल्याने या ...
जळगाव : शिवाजीनगरातील डी.बी. जैन रुग्णालयात कोरोना लसीकरणाची प्रक्रिया पार पडणार असून, शहरात महापालिकेचे हे एकच केंद्र असल्याने या ठिकाणी डॉक्टरांची फौजच हजर राहणार आहे. या ठिकाणी महापालिकेचे १० डॉक्टर आणि समितीचे डॉक्टर उपस्थित असतील. लसीकरणानंतर कोणाला काही गंभीर रिॲक्शन समोर आल्यास त्यादृष्टीने महापालिकेच्या यंत्रणेत एक समिती गठित करण्यात आली असून, यासाठी सहयोग क्रिटिकलला दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.
या समितीत एक फिजिशियन, भूलतज्ज्ञ, न्यूरोसर्जन, हृदयरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, आयएमएचे पदाधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. ए.एम. अझर यांचा समावेश आहे. यासह स्थानिक पातळीवर ऑक्सिजन सिलिंडर, बेड, आपात्कालीन कीट आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर रुग्णवाहिका राहणार आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी लस घेणाऱ्यांमध्ये चार डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती आहे. रुग्णांशी निगडित आरोग्य कर्मचारीच पहिल्या टप्प्यात लस घेणार असल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी सांगितले.