संत मुक्ताई पालखीसाठी दोन बसेस पंढरपूरला सोडण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:12 AM2021-06-24T04:12:37+5:302021-06-24T04:12:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसाठी राज्यातील मानाच्या दहा पालख्यांनाच परवानगी दिली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसाठी राज्यातील मानाच्या दहा पालख्यांनाच परवानगी दिली असून, यामध्ये जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पाखलीचाही समावेश आहे. त्यानुसार या पालखीसाठी शासनाच्या सूचनेनुसार मुक्ताईनगरहून दोन बसेस पंढरपूरला सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी 'लोकमत'ला दिली. तसेच विविध आगारातील पंढरपूरच्या फेऱ्या नियमित वेळापत्रकानुसार लवकरच सुरू होणार असल्याचेही जगनोर यांनी सांगितले.
पुढील महिन्यात २० जुलै रोजी आषाढी एकादशी असून, दरवर्षी या वारीसाठी पंढरपुरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालख्या व दिंड्या येत असतात. मात्र, गेल्या वर्षांपासून शासनाने कोरोना संसर्गांच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील यात्रा सोहळा रद्द केला असून, फक्त मानाच्याच पालख्यांना पंढरपुरात येण्यास परवानगी देण्यात येत आहे. यंदा राज्यातील विविध दहा ठिकाणच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली असून, यात जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचाही समावेश आहे. ही पालखी यंदा पायी न जाता महामंडळाने यासाठी मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २० रोजी आषाढी एकादशी असल्याने, १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मुक्ताईनगरहून दोन बसेस पालखी व वारकरी बांधवांना घेऊन, पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. पंढरपूर येथील सर्व पूजा-विधी पार पाडून या पालख्या महामंडळाच्या बसनेच २४ जुलै रोजी दुपारी २ वाजता या बसेस मुक्ताईनगरकडे रवाना होणार आहेत. या दोन्ही बसमध्ये एकूण ६० वारकरी बांधवांनाच पंढरपूरलाच नेणार असल्याचे जगनोर यांनी सांगितले.
इन्फो :
पुढील महिन्यापासून पंढरपूरच्या नियमित फेऱ्या
कोरोनामुळे महामंडळातर्फे गेल्या वर्षांपासून पंढरपूरच्या विविध आगारातून धावणाऱ्या फेऱ्या सध्या स्थगित ठेवल्या आहेत. मात्र, आता पुढील महिन्यापासून जळगाव, मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ व इतर आगारातून पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे बस फेऱ्या सुरू करण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. या फेऱ्या सुरू झाल्यामुळे भक्तांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेणे सोयीचे होणार आहे.