बिबटे पकडण्यासाठी जळगाव विमानतळावर लावले दोन पिंजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 01:12 PM2019-06-07T13:12:43+5:302019-06-07T13:13:23+5:30
जलसंपदामंत्र्यांनीही केली पाहणी
जळगाव : विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून दोन बिबटे आढळून आल्यामुळे विमानतळ बंद असून वनविभागाकडून बिबटे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गुरूवार, ६ जून रोजी याबाबत आढावा घेतल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नवनिर्वाचीत खासदार उन्मेष पाटील यांच्यासह दुपारी ४ वाजेच्या सुमारास विमानतळाला भेट देऊन वनविभागाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, भाजपाचे मनपातील गटनेते भगत बालाणी आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीनंतर नूतन खासदारांना केंद्र सरकारशी संबंधीत जिल्ह्यातील विषयांची माहिती व्हावी, यासाठी गुरूवारी दुपारी अजिंठा विश्रामगृहावर महामार्ग, विमानतळ, बीएसएनएल आदी विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील हे उपस्थित होते. त्यांनी या विभागांकडील जिल्ह्यात सुरू असलेली तसेच रखडलेल्या कामांची माहिती घेतली. यावेळी विमानतळावर दोन बिबटे आढळल्याने विमानतळ बंद असल्याचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे बैठक आटोपताच जलसंपदामंत्री महाजन हे आमदार, खासदारांच्या ताफ्यासह दुपारी ४ वाजता विमानतळावर दाखल झाले. विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी तसेच जळगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जी. पाटील उपस्थित होते. बिबट्याबाबत घेतली माहिती गिरीश महाजन यांनी यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्या कुठून विमानतळावर येतो? किती बिबटे आहेत? आदी माहिती घेतली. वनविभाग व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी ट्रॅप कॅमेºयात आढळलेले दोन बिबट्यांचे चित्रणही महाजन व उपस्थित आमदार, खासदारांना दाखविले. तसेच दोन पिंजरे लावण्याची परवानगी मिळाली असून तेच काम सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. दोन पिंजरे लावले या बैठकीनंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी दोन्ही बिबट्यांना पकडण्यासाठी दोन पिंजंरे विमानतळावर लावले. त्यात सावजही ठेवण्यात आले आहे.