जंगलात पाठलाग करुन पकडले दोघांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:58 PM2019-08-26T12:58:19+5:302019-08-26T12:59:02+5:30
घनश्याम दीक्षित खून प्रकरण : पोलीस अधीक्षकांच्या बदलीच्या महिलांकडून घोषणा
जळगाव : घनश्याम दीक्षित या मनसे कार्यकर्त्यांचा खून करुन पसार झालेल्या सनी उर्फ चाळीस वसंत पाटील (रा.रामेश्वर कॉलनी) व मोहनीराज उर्फ मोन्या अशोक कोळी (रा.सबजेल मागे,जळगाव) या दोघांना पोलिसांनी पाळधी, ता.जामनेर येथे शेतकऱ्यांच्या मदतीने पाठलाग करुन पकडले. पोलीस पकडतील या भीतीने ते सैरभैर धावत होते, मात्र पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळून लावत अवघ्या पाच तासातच दोघांच्या मुसक्या आवळल्या.
घनश्याम याला ठार मारल्यानंतर सनी व मोन्या दोघंही दुचाकी पिंपळगाव, ता. जामनेरकडे पळाले. सकाळपासून पोलीस चौकशीत असताना हा खून मनीराज उर्फ मोन्या कोळी याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम व एमआयडीसीचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी तपासाचे चक्र फिरविले. निरीक्षक शिरसाठ सहायक फौजदार रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, मनोज सुरवाडे, विजय पाटील, हेमंत कळसकर, गोविंदा पाटील, प्रवीण मांडोळे, निलेश पाटील, सचिन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, अरुण राजपूत व रणजीत जाधव यांचे एक पथक पिंपळगावकडे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे हे.कॉ. विजय पाटील व नरेंद्र वारुळे हे पथकाला तांत्रिक माहिती पुरवित होते. त्यानुसार दोघं जण पाळधी येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना पाहून या दोघांनी दुचाकी सोडून जंगलात पळ काढला. मनोज सुरवाडे, विजय पाटील, किशोर पाटील व शेतकऱ्यांनी पोलिसांनी चारही बाजुंनी पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले.
पहाटे ५२० रुपये ट्रान्झक्शन
घनश्याम याचा मोबाईल पोलिसांनी तपासला असता तो लॉक होता, मात्र स्क्रीनवर पहाटे तीन वाजता ५२० रुपयाचे त्याच्या खात्यातून ट्रान्झक्शन झाल्याचे दिसत होते. पोलिसांनी लॉक उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. रक्ताने माखलेले हात धुवून फिंगर प्रिंटद्वारेही लॉक उघडण्याचा प्रयत्न झाला, पण त्यातही यश आले नाही.
घटनेमागे वेगळ्या कारणाची चर्चा
घनश्यामचा हॉटेलमधील वाद व मोन्या याचे त्याच्याकडे असलेले १० हजार रुपये व ही रक्कम चारचौघात मागितल्याच्या कारणावरुन ही घटना घडल्याचे सांगितले जात असले तरी पोलिसांना या घटनेमागे आणखी वेगळे कारण असावे अशी शक्यता वाटत आहे, त्यादृष्टीने पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. सहायक फौजदार अतुल वंजारी व आनंदसिंग पाटील यांनी घटनेनंतर हॉटेलमधील त्याच्या चार जणांना ताब्यात घेतलेल्यांची चौकशी केली, मात्र त्यात त्यांच्याकडून फारशी माहिती मिळाली नाही. मुळ कारणाचा त्यांच्याकडून शोध घेतला जात आहे.
‘सिव्हील’समोर महिलांनी रोखला रस्ता
घनश्यामच्या मारेकºयाला अटक व्हावी, त्याला न्याय मिळावा या मागणीसाठी विविध संघटनेच्या महिलांनी जिल्हा रुग्णालयासमोर रस्त्यावर बसून पोलिसांच्याविरुध्द घोषणाबाजी केली. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या बदलीच्याही महिलांनी घोषणा दिल्या. दरम्यान, विना परवानगी रस्ता अडविल्याने जिल्हा पेठचे निरीक्षक अकबर पटेल यांनी या महिलांवर कारवाई करण्याचा इशारा दिला असता या महिलांनी पोलिसांना घेराव घातला. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. येथून या महिला नंतर पुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात येत या महिलांनी कारवाईसाठी पोलिसांना जाब विचारला.
राजकीय पदाधिकारी ते एजंट
घनश्याम हा पत्नी भाग्यश्री, आई शोभा,मुलगा दक्ष, मुलगी रुतू बहिण ममता व भाऊ गणेश यांच्यासोबत राहत होता. तहसील कार्यालयात दाखले व इतर कामे करुन त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा. तो काही वर्षापूर्वी मनसेचा शहर उपाध्यक्ष व विद्यार्थी सेनेचाही पदाधिकारी होता. माजी महापौर ललित कोल्हे यांनी मनसे सोडल्यानंतर त्यानेही काम थांबविले होते. महापालिकेच्या निवडणुकीत त्याने अर्ज भरला होता व नंतर हा अर्ज त्याने मागेही घेतला होता. घनश्याम याचा चांगला जनसंपर्क होता. सामाजिक कार्यात तो पुढे असायचा.