नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 08:33 PM2024-04-15T20:33:57+5:302024-04-15T20:34:15+5:30
यावल तालुक्यातील घटना : दोघे जण होते जळगावचे.
सुधीर चौधरी, यावल (जि. जळगाव) : शिरागड ता. यावल येथे तापी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या जळगाव येथील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
रोहन काशिनाथ श्रीखंडे (१७, रा. रामानंद नगर, जळगाव) आणि प्रथमेश शरद सोनवणे (१७, रा. वाघ नगर, जळगाव) अशी या मृत मुलांची नावे आहेत. रोहन आणि प्रथमेश हे दोघे जण जळगावहून दुपारी १ वाजता शिरागड येथे सप्तशृंगी देवीचे मंदिरात दर्शनासाठी आले होते. यानंतर ते समोरच असलेल्या तापी नदीत आंघोळीसाठी गेले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही जण बुडाले. हा प्रकार काठावरील काही लोकांच्या लक्षात आला. काही जणांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना लागलीच यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले.
या प्रकरणी शरद शिवराम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. सिकंदर तडवी, भरत कोळी करीत आहेत.