जुळले दोन गतीमंद जिवांचे रेशीमबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 07:44 PM2017-08-10T19:44:20+5:302017-08-10T19:45:16+5:30
चाळीसगावात आदर्श सप्तपदी. स्वयंदीप परिवाराचे अनोखे कन्यादान
जिजाबराव वाघ / ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव,दि.10- चाळीसगावचा स्वप्निल आणि स्वयंदीप परिवाराची कन्या कल्पना दोघेही गतीमंद दिव्यांग असलेले. स्वयंदीप परिवाराच्या प्रमुख मिनाक्षी निकम यांच्या प्रय}ातून या दोघांची विवाह रेशीमगाठ बांधली गेली, आणि त्यांच्या चेह-यावर आनंदाचे हास्य फुलले. गुरुवारी दुपारी या अनोख्या विवाहाची मंगल सनई निनादली.
आखतवाडे येथील मूळ रहिवासी कल्पना अशोक चौधरी हीचे मातृ-पितृ अकाली हरपले. अनाथ झालेल्या कल्पनाला स्वयंदीपने आधार दिला. चाळीसगाव येथील खरजई नाक्याजवळ राहणारे संजय व साधना दिक्षित यांचा स्वप्निल हा मुलगा. तो गतीमंद असला तरी घरीच किराणा दुकान चालवतो. संजय दीक्षित हे रेल्वेत इंजिनिअर आहेत. जुळले रेशीमबंध विवाहाच्या रेशीमगाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हणतात. मात्र कल्पना आणि संजयची गाठ स्वयंदीप परिवाराने बांधली. हनुमान वाडीत स्वयंदीप दिव्यांग परिवारातील भगिनी स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरु करुन कणखरपणे उभ्या राहिल्या आहेत. याच परिवारातील मनिषा हिचा विवाह मे मध्ये झाला. त्यावेळी कल्पना आणि स्वप्निलची भेट झाली. दोघांच्या परिवाराचा होकार मिळाल्यानंतर त्यांचा विवाह निश्चित झाला. ठरल्यानुसार धुळेरोडस्थित अॅड.राजश्री पांडे यांच्या निवासस्थानी 10 रोजी दुपारी साडेचार वाजता हा सोहळा पार पडला. यावेळी व-हाडी मंडळी म्हणून दीक्षित परिवार, कल्पनाचे काका, स्वयंदीप परिवारातील दिव्यांग भगिनी उपस्थित होत्या. स्वयंदीप परिवारात स्वालंबनाचे धडे देतांना आयुष्य फुलविण्याचेही काम केले जाते. आधार आणि प्रेरणा हे आमचे ध्येयगीत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात स्वयंदीपने 10 ते 12 दिव्यांगांचे विवाह सोहळे यशस्वी केले आहेत. कल्पना ही स्वयंदीपची लेक असल्याने तिचे कन्यादान करतांना ऊर भरुन आला.. -मिनाक्षी निकम प्रमुख स्वयंदीप दिव्यांग भगिनी परिवार, चाळीसगाव