भुसावळात दोन नगरसेवकांना डच्चू? प्रा.सुनील नेवे यांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:42 AM2019-01-06T01:42:28+5:302019-01-06T01:47:51+5:30
इतर नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी येथील उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापती हे गेल्या वर्षापासूून बदलण्यात येत आहेत. गेल्या वर्षी स्वीकृत नगरसेवकांना मात्र कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना ‘एक’ तर ‘नेत्यांना’ वेगळा न्याय का, असा प्रश्न भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दोन नगरसेवकांना बदलण्यात येणार असून, प्रा.सुनील नेवे यांना मात्र पाच वर्षासाठी कायम स्वीकृत नगरसेवक म्हणून ठेवण्यात येणार आहे.
उत्तम काळे
भुसावळ, जि.जळगाव : इतर नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी येथील उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापती हे गेल्या वर्षापासूून बदलण्यात येत आहेत. गेल्या वर्षी स्वीकृत नगरसेवकांना मात्र कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना ‘एक’ तर ‘नेत्यांना’ वेगळा न्याय का, असा प्रश्न भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी दोन नगरसेवकांना बदलण्यात येणार असून, प्रा.सुनील नेवे यांना मात्र पाच वर्षासाठी कायम स्वीकृत नगरसेवक म्हणून ठेवण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
येथील पालिकेची निवडणूक डिसेंबर २०१६ मध्ये झाली. या निवडणुकीत भाजपातर्फे रमण भोळेही जनतेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले, तर नगरसेवकही बहुमताने निवडून आले होते. त्यामुळे त्यावेळी उपनगराध्यक्ष म्हणून युवराज लोणारी यांना संधी देण्यात आली, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून मनोज बियाणी, चंद्रशेखर अत्तरदे व प्रा.सुनील नावे यांना संधी देण्यात आली.
यावेळी पाच वर्षात पाच नगरसेवकांना उपनगराध्यक्ष व सभापती त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवक यांना एक-एक वर्षासाठी संधी देण्यात येणार असल्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली होती.
मात्र गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये उपनगराध्यक्ष लोणारी यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, तर विषय समित्यांच्या सभापती यांनीही सभापती पदांचे राजीनामे दिले होते. स्वीकृत नगरसेवकांचे राजीनामे मागण्याचे धाडस मात्र त्यावेळी कोणीही दाखवले नव्हते.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपाकडून राजेंद्र आवटे, दीपक धांडे, रेखा सोनवणे हे उमेदवार अल्पशा मतांनी पराभूत झाले होते, तर नगरसेविका प्रतिभा पाटील यांना उमेदवारी देऊन माजी नगरसेवक वसंत पाटील यांना उमेदवारीपासून दूर ठेवण्यात आले होते. तसेच शेखर इंगळे, पवन बुंदेले यांनाही उमेदवारी देण्यात आली नव्हती.
दरम्यान, त्या निवडणुकीत धांडे यांच्याविरुद्ध चंद्रशेखर अत्तरदे यांचे शालक मुकेश पाटील हे अपक्ष निवडून आले होते. त्यामुळे धांडे यांच्या पराभवाचे खापर त्यावेळी भाजपाच्याच काही पदाधिकाऱ्यांवर फोडण्यात आले होते. मात्र असे असले तरी त्यांना डावलून अत्तरदे यांना पुन्हा स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात आली.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवक अत्तरदे यांच्या पत्नी माधुरी अत्तरदे या भाजपाकडून जि. प. सदस्य म्हणून निवडून आले आहे, तर आई अत्तरदे या भाजपाकडून जळगाव मनपाच्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहे. पत्नी जिल्हा परिषद सदस्य, तर आई मनपात नगरसेविका, तरीही त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
गेल्या २० वर्षांपासून माजी आमदार संतोष चौधरी व अनिल चौधरी यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे माजी नगरसेवक वसंत पाटील, विद्यार्थी सेनेपासून कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे धांडे यांनी भाजपात प्रवेश करूनही त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे, तर गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपाचे सेवा करणारे शेखर इंगळे, राजेंद्र आवटे पवन बुंदेले यांनाही संधी देण्यात येत नसल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्यात आलेले ‘त्रिकूट’ हे अभ्यासू असल्यामुळे व न.पा.तील बैठक सुरळीत चालविण्यासाठी त्यांना घेण्यात आल्याचा दावा त्या वेळी करण्यात आला होता. मात्र गेल्या दोन वर्षात न.पा.च्या बैठका केवळ तीन मिनिटात गुंडाळण्यात येत आहे. त्यामुळे येथे सत्ताधाºयांना कधीच विरोधकांच्या प्रश्नांचा भडीमारासमोर जाण्याची गरजच भासली नाही, तर वंचित राहिलेले कार्यकतेर्ही अभ्यासू असल्याचे त्यांनी नपाच्या सभागृहात तसेच अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. तरीही त्यांना संधी का देण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
प्रा.नेवे पाच वर्षासाठी स्वीकृत
दरम्यान, यावर्षी चंद्रशेखर अत्तरदे व मनोज बियाणी यांच्या जागेवर कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली, तर प्रा.नेवे यांना मात्र पाच वर्षासाठी कायम स्वीकृत नगरसेवक म्हणून ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बियाणींच्या जागी धांडे, तर अत्तरदेंच्या जागी?
दीपक धांडे हे बियाणी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत, त्यामुळे बियाणी हे धांडे यांच्यासाठी राजीनामा देणार होते, अशी चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू होती. त्यामुळे बियाणी यांच्या जागेवर धांडे यांना संधी मिळू शकते मात्र अत्तरदे यांच्या जागेवर कोणाला संधी मिळणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.