निगेटीव्ह म्हणून सोडले दोन दिवसांनी पॉझिटीव्ह म्हणून घ्यायला आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 12:50 PM2020-07-05T12:50:10+5:302020-07-05T12:50:45+5:30
जोशी कॉलनीत गोंधळ
जळगाव : शहरातील जोशी कॉलनीतील एका महिलेला अधिग्रहीत रुग्णालयातून निगेटीव्ह असल्याचे सांगत घरी सोडण्यात आले़ मात्र, दोन दिवसांनी सकाळी सकाळी महापालिकेचे पथक दारात धडकले व आपण पॉझिटीव्ह आहात, आमच्याबरोबर सर्वांना यायला लागले असे सांगू लागले व सर्वांचेच धाबे दणाणले़ कारण घरात महिलेच्या वडिलांचा दशक्रिया विधी सुरू होता व या कार्यक्रमाला महिलेच्या संपर्कात तीस ते पस्तीस नातेवाईक आले होते़
मिळालेल्या माहितीनुसार जोशी कॉलनीतील ४५ वर्षीय महिलेला काही दिवसांपूर्वी श्वास घ्यायला त्रास होत होता़ म्हणून या महिलेचे नातेवाईक महिलेला एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले होते़
त्या ठिकाणी डॉक्टरांनी शंका व्यक्त करीत महिलेला कोविडसाठी अधिग्रही त रुग्णालयात दाखल करण्यास सांगण्यात आले़ २९ जून रोजी या महिलेला त्या ठिकाणी दाखल करून त्यांचे नमुने घेण्यात आले़ २ जुलै रोजी अहवाल निगेटीव्ह आल्याचे सांगत थेट त्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले़
महिलेला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने अन्य उपचारांची मागणी नातेवाईकांनी केली मात्र, अहवाल निगेटीव्ह असून घरीच उपचार घ्या, असे रुग्णालयातून सांगण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे़ दरम्यान, अहवाल निगेटीव्ह असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला़ यानंतर काही नातेवाईक भेटायलाही आले़
सायंकाळी या महिलेसह संपर्कातील दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेचा पहिला अहवाल हा इनकन्क्ल्युझिव्ह अर्थात अस्पष्ट होता़ अशा स्थितीत या महिलेला होम क्वारंटाईनच्या सूचना देत डिस्चार्ज करण्यात आले होते़ मात्र, या महिलेचा अहवालनंतर पॉझिटीव्ह आला़ असे रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे़
सर्वांना धक्का, अन् गोंधळ उडाला
महिलेच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर ४ जुलै रोजी त्यांचा दशक्रिया विधी होता़ यासाठी ३० ते ३५ लोक जमले होते़ निगेटीव्ह असल्याने या महिलाही त्यांच्यात मिसळल्या होत्या़ अशातच सकाळी दहा वाजेच्या सुमारास महापालिकेचे पथक आले व तुमचा रिर्पोट पॉझिटीव्ह आहे. तुम्हाला आमच्या सोबत यावे लागेल असे ते म्हणाले व सर्वांनाच धक्का बसला़ यावेळी बराच वेळ गोंधळ झाला होता़ अखेर महापालिकेचे पथक तसेच निघून गेले़ नंतर परिसरातील सर्वांनी समजूत काढली़ मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत महापलिकेच्या पथकाचा पत्ता नव्हता़