दोन दिवसात सर्दी, खोकला, तापाचे ५० टक्के रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:13 AM2021-01-09T04:13:02+5:302021-01-09T04:13:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण यामुळे सर्दी, खोकला आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण यामुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण ५० टक्क्यांनी वाढले असून, यात कोरोनाचीच लक्षणे असल्याने रुग्णांमध्ये संभ्रमावस्था अधिक निर्माण झाल्याचे चित्र आहे.
कोरोनाचीही विविध लक्षणे असून यात सर्दी, खोकला, ताप ही प्रमुख लक्षणे असून, चव न लागणे, वास न येणे आदी लक्षणेही कोरोनाची असू शकतात. त्यामुळे प्राथमिक स्वरूपात अशी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्यानुसार तपासणी करून घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात पाऊसही झाला. याचा थेट परिणाम आरोग्यावर झाला आहे.
पोटदुखी वाढली
गेल्या काही दिवसांपासून लग्नसराई अधिक असल्याने यात अवेळी, तेलकट, तुपकट, मसालेदार खाणाऱ्यांची संख्या वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचे रुग्णही अधिक येत असल्याची माहिती खासगी डॉक्टरांनी दिली.
कोरोना वाढणार नाही?
कोरोनाचा वर्षभराचा इतिहास बघता आणि आकडे बघता वातावरणाचा कोरोनावर मोठा परिणाम झालेला आहे. म्हणजेच तापमान वाढले म्हणून कोरोना कमी झाला आणि तापमान घटले म्हणून कोरोना वाढला, असे काही आजपर्यंत निदर्शनास आले नाही. त्यामुळे या वातावरणामुळे कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत, अशी शक्यता काही डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
ही काळजी घ्या
पाऊस थंडीपासून बचाव करा
थंडीत सकाळी फिरताना पुरेशी काळजी घ्या
जेवण वेळेवर आणि ताजे, पोष्टीक घ्या, तेलगट, थंड खाणे टाळा
गरम पाण्याच्या गुळण्या करा
गरम पाण्याची वाफ घ्या
गेल्या देान दिवसांपासून सर्दी, खोकला तापाच्या रुग्णात शिवाय पोटदुखीच्या रुग्णात वाढ झाली आहे. थंडी, पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे रुग्ण वाढले आहेत. - डॉ. उत्तम चौधरी, जनरल प्रॅक्टीशनर.