दोन कुटुंबे झाली निराधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:12 AM2021-06-11T04:12:37+5:302021-06-11T04:12:37+5:30
कासोदा, ता. एरंडोल: अचानक आलेल्या आसमानी संकटात वीज कोसळल्याने तळई येथील दोन जणांचा मृत्यू ...
कासोदा, ता. एरंडोल: अचानक आलेल्या आसमानी संकटात वीज कोसळल्याने तळई येथील दोन जणांचा मृत्यू झाला. दोन कुटुंब निराधार झाली तर केवळ नशिबाने सात शेतकऱ्यांचा जणू पुनर्जन्मच झाला आहे.
दि.१७ आक्टोबर २०२० रोजी एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे कापूस वेचणी करीत असतानाच अचानक आलेला पाऊस व वीज कोसळल्याने दोन शेतकऱ्यांचा असाच मृत्यू ओढवला होता. बुधवारी पुन्हा तळई येथे भोकरच्या झाडाखाली थांबलेल्या शेतकऱ्यांवर ही संकटरुपी वीज कडाडली, विक्रम दौलत चौधरी (माळी) हे जागीच ठार झाले तर भूषण अनिल पाटील यास उपचारासाठी जळगावी नेत असतांनाच रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.
यंदाच्या हंगामात नव्या दमाने शेती करावी, नवनवे आधुनिक प्रयोग करून उत्पादन वाढविण्याचे या शेतकऱ्यांचे स्वप्न क्षणार्धात निसर्गाच्या प्रकोपाचे धुळीस मिळाले आहे. भूषण तर अगदीच कोवळा मुलगा, यंदा ११व्या वर्गात होता. शिक्षणासोबतच पाण्याचे जार पुरवायचा त्याचा व्यवसायही सुरू होता. तीन बहिणींचा एकुलता भाऊ होता. कुटुंबाचा आधार होता. विक्रम चौधरी व भूषणवर दीड तासाच्या अंतराने अंत्यसंस्कार करण्यात आ.
शांताराम आनंदा धनगर (४३),योगेश रवींद्र धनगर (१८), रमेश कौतिक धनगर (५५) निवृत्ती रमेश धनगर (३८), संदीप वामन वाघ (३५), सुरेश हरी पाटील (३०) व विजय नामदेव नाईक (२५) हे इतर लोक केवळ नशीब बलवत्तर होते, म्हणून बचावले आहेत. या सगळ्याचा हा पुनर्जन्मच म्हणता येईल, अशा भावना यावेळी उपस्थित लोक व्यक्त करीत होते. आता या कुटुंबाला सरकारकडून मदत मिळेल ही, काही ठरावीक काळ अनेक लोक संवेदना व्यक्त करतील ही, पण हे दोन्ही व्यक्ती कुटुंबाचे प्रमुख आधार होते, ती पोकळी मात्र कधीही न भरून निघणारी आहे.
फोटो ओळ: तळई येथील हेच ते भोकरचे झाड,याच झाडाखाली आश्रयाला असलेल्या शेतकऱ्यांवर वीज कोसळली होती,त्यात दोघांना प्राण गमवावे लागले.