पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:14 AM2021-07-17T04:14:20+5:302021-07-17T04:14:20+5:30

जळगाव : घरगुती वादातून जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात दोन कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात तीनजण गंभीर जखमी झाले ...

Two families clash in Superintendent of Police's office premises | पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात दोन कुटुंबांमध्ये हाणामारी

Next

जळगाव : घरगुती वादातून जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात दोन कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यात तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, एलसीबीचे कर्मचारी व महिला दक्षता समितीच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

पैठण येथील गणेश गिरी यांचा विवाह जामनेर तालुक्यातील वाकोद येथील बरखा यांच्याशी चार महिन्यांपूर्वी झाला होता. काही महिने सुखी संसार झाल्यानंतर दोघांमध्ये ताण-तणाव निर्माण झाला. नव-याने घर जावई व्हावे यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे बरखा ही जामनेरला आई-वडिलांकडे निघून आली. याप्रकरणी महिला दक्षता समितीमध्ये तक्रार करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास दोन्ही कुटुंबातील परिवार पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या ठिकाणी तारखेवर आले होते. त्यावेळी हेडकॉन्स्टेबल मनीषा पाटील, अभिलाषा मनोरे, संगीता पवार यांनी दोन्ही कुटुंबांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना समुपदेशन केले. त्यानंतर दोघं परिवार कार्यालयातून बाहेर पडले.

बाहेर पडताच कुटुंबामध्ये हाणामारी

दोन्ही परिवार कार्यालयातून बाहेर पडताच त्यांच्यामध्ये तुफान हाणामारी झाली. यात गणेश गिरी याने आपल्या खिशातून फायटर काढीत त्याने संतोषगिरी उत्तमगिरी गोसावी व मनोजगिरी बाजीरावगिरी गोसावी या दोघांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर शिवागिरी गोसावी, चंदाबाई अरुण गोसावी, निर्मलाबाई गिरी, भगवानगिरी गोसावी, गजूगिरी गोसावी यांनी बरखा गिरी, ललिता गोसावी यांना मारहाण करीत जखमी केले. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

पोलिसांनी केली मध्यस्थी

महिला दक्षता कार्यालयाच्या बाहेर हाणामारी होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेत मध्यस्थी केली. दोन्ही कुटुंबीयांची पोलिसांनी समजूत घातली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. दरम्यान, घटनेची माहिती जिल्हा पोलीस ठाण्यात कळविण्यात आल्याचे महिला दक्षता समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Two families clash in Superintendent of Police's office premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.