जळगावात मोडलेले दोन संसार समुपदेशनामुळे पुन्हा बहरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 02:13 PM2017-12-07T14:13:56+5:302017-12-07T14:18:59+5:30
दोन्ही कुटुंबांच्या आयुष्याला नव्याने झाली सुरुवात
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.७ : किरकोळ कारणावरुन दुरावलेल्या दोन कुटुंबातील पती-पत्नीला सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी यांनी पुढाकार घेऊन एकत्र आणून त्यांचा संसार पुन्हा बहरला आहे. यातील एक कुटुंबाचा तर पंच घटस्फोट झाला होता तर दुसºया एका दाम्पत्याला एक गोंडस बाळही होते. त्यामुळे या दोघा कुटुंबांनी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली.
पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील संतोष खैरनार यांच्याशी जळगावातील संध्या यांचे लग्न झाले. दोघांचा सुखी संसार सुरू असताना दीड वर्षानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. अशातच संध्या यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. दोघांमध्ये टोकाचा वाद झाला त्यामुळे ते विभक्त राहायला लागले. पत्नी संध्या यांनी समाजसेविका मंगला बारी यांच्याकडे संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर बारी यांनी जळगावात गोलाणी मार्केट येथे बोलवून त्याची समजूत घातली. दोघांनाही विश्वासात घेऊन त्यांच्यातील मतभेद दूर केले. दोघांनीही सकारात्मकता दर्शविल्यानंतर त्यांचा मोडलेला संसार पुन्हा जोडला गेला आहे. या दोघांनीही एकमेकांसोबत पुढील आयुष्य गुण्यागोविंदाने नोंदण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा बारी यांनी गुलाबपुष्प देऊन गौरव केला.
पंच फारकत झाले जोडपे एकत्र...
प्रल्हाद बद्रीनाथ बारी व सरला बारी या दाम्पत्याचादेखील बारी यांनी समेट घडवून आणला.दहा वर्षांपूर्वी प्रल्हाद बारी यांचा सरला यांच्याशी विवाह झाला होता. कामासाठी दोघं पिंप्राळा येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते.दोघांमध्ये कौटुंबिक कलहातून मोठा वाद झाला. त्यातून दोघांची पंचफारकती झाली होती. पंच फारकती झाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून दोन्ही विभक्त झाले होते. मंगला बारी यांनी या कुटुंबातील सदस्यांची समजूत घातली. दोन दिवसापूर्वीच हे दाम्पत्य पुन्हा एकत्र आले आहे. दरम्यान, मंगला बारी यांनी आतापर्यंत २५१ दाम्पत्यांचा संसार पुन्हा जोडलेला आहे.