मित्रांवर काळाचा घाला; भरधाव कार दुचाकीवर धडकली, दोघांचा जागीच मृत्यू
By सागर दुबे | Published: December 5, 2022 08:56 PM2022-12-05T20:56:13+5:302022-12-05T20:56:22+5:30
या तरूणांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.
जळगाव : आपआपली कामे आटोपून घराकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला भरधाव कारने समोरून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील मित्रांचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना शिरसोली गावाजवळील हनुमान मंदिराजवळ सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. रफिक हुसेन मेवाती (२३) व अरबाज जहांगीर मेवाती (२०, दोन्ही रा. राणीचे बांबरूड,ता. पाचोरा) असे मृत मित्रांचे नावे आहेत. या तरूणांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत होती.
राणीचे बांबरूड येथे रफिक मेवाती हा आई-वडील, तीन भाऊ व बहिणीसह वास्तव्यास होता. तो जळगाव शहरातील मास्टर कॉलनीमध्ये पेरू विक्री करायचा. नेहमीप्रमाणे सोमवारी सुध्दा रफिक मास्टर कॉलनीमध्ये पेरू विक्रीसाठी आला होता. दुसरीकडे त्याचा मित्र अरबाज याने दहा ते पंधरा दिवसांपूर्वी नवीन मिनी ट्रक खरेदी केला होता. त्यामुळे वाहनाच्या कामानिमित्त औरंगाबाद गेला होता. सायंकाळी तो जळगावात परतला. त्यानंतर रफिक आणि अरबाज हे एकाच दुचाकीने (एमएच.१९.सीएच.४३५९) घरी जाण्यासाठी निघाले.
सुसाट कार धडकली अन् दोघं जागीच ठार...
शिरसोली गावाच्या काही अंतरावर असलेल्या हनुमान मंदिराजवळून रफिक, अरबाज हे जात असताना त्यांच्या दुचाकीला पाचो-याकडून शिरसोलीकडे भरधाव येणा-या कारने (एमएच.१९.बीजे.२१७५) समोरून धडकली दिली. अपघात एवढा भीषण होता की, रफिक, अरबाज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे कारचा पुढील भागाचा चुराडा झाला होता. तर दुचाकीच्या पुढील भागाचे देखील नुकसान झाले होते.
ग्रामस्थांसह पोलिसांची घटनास्थळी धाव...
शिरसोली गावाजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरसोली ग्रामस्थांसह एमआयडीसी पोलिस ठाण्यातील जितेंद्र राठोड, समाधान टहाकळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर रूग्णवाहिका बोलवून तत्काळ रफिक आणि अरबाज यांना जिल्हा रूग्णालयात नेले. वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती दोघांना मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांसह ग्रामस्थांची गर्दी झाली होती. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.