राजमालती नगरात दोन गट भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:11 AM2021-05-03T04:11:08+5:302021-05-03T04:11:08+5:30

नऊजणांना अटक : ३० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा जळगाव : राजमालती नगर येथे शनिवारी दोन गट एकमेकांना भिडले. त्यात लोखंडी ...

Two groups clashed in Rajmalati town | राजमालती नगरात दोन गट भिडले

राजमालती नगरात दोन गट भिडले

Next

नऊजणांना अटक : ३० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा

जळगाव : राजमालती नगर येथे शनिवारी दोन गट एकमेकांना भिडले. त्यात लोखंडी रॉड, लाठ्याकाठ्या व इतर हत्यारांचा वापर झाला. या हाणामारीत चार दुचाकींसह दोन चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या परस्पर विरोधात २८ ते ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची ओढणी ओढणे व क्रिकेट खेळण्यावरून वादाला तोंड फुटल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यात दोन्ही गटांतील नऊजणांना अटक करण्यात आली आहे. विशाल अजय सुरवाडे, सिद्धार्थ माणिक वानखेडे, दर्शन विजय सुरवाडे, गौतम लक्ष्मण बिर्हाडे, राजू बिस्मिल्ला पटेल, मेहमूद बिस्मिल्ला पटेल, फैजान ऊर्फ आवेश राजू पटेल, इमरान ऊर्फ बबलू हारून पटेल व जुनेद गफूर पटेल अशी अटकेतील संशयितांची नावे असून, त्यांना न्यायालयाने रविवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत सिद्धार्थ माणिक वानखेडे (वय ३४, रा. राजमालती नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गल्लीतील काही मुले राज मालती नगराच्या बाजूला असलेल्या शेतामध्ये क्रिकेट खेळत होती. यावेळी जानू पटेल नावाचा मुलगा आला व तो विशाल अजय सुरवाडे याच्या कानात जोरजोराने आरोळ्या मारत होता. विशालने त्यास आरोळ्या मारू नको असे सांगितले असता जानू पटेल याने वाद घालत त्याच्या वडिलांसह इतर नातेवाइकांना घटनास्थळी बोलावले. घटनास्थळी आल्याने लोखंडी रॉड तसेच लाकडी बॅटने वानखेडे यांच्यासह विशाल सुरवाडे यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करत जखमी केले. तसेच सुरवाडे, वानखेडे यांच्या परिवाराच्या चार दुचाकींसह दोन चारचाकींची तोडफोड करत नुकसान केले. याप्रकरणी राजू बिस्मिल्ला पटेल, संजू बिस्मिल्ला पटेल, मेहमूद बिस्मिल्ला पटेल, आवेश राजू पटेल, जस्मिन राजू पटेल, जानू संजू पटेल, मुन्नी राजू पटेल, परवीन राज पटेल व इतर पाचजण यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तसेच राजू पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विशाल सुरवाडे याने पटेल यांच्या नात्यातील मुलीची छेड काढली. त्याचा जाब विचारण्यासाठी राजू पटेल गेले असता विशाल सुरवाडे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांनी व नातेवाइकांनी पटेल यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना बेसबॉलचा दांडा, लोखंडी रॉड, लोखंडी सळ्या यांनी बेदम मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी विशाल अजय सुरवाडे, सिद्धार्थ ऊर्फ बाळा माणिक वानखेडे, अजय पांडुरंग सुरवाडे, विजय पांडुरंग सुरवाडे, दर्शन विजय सुरवाडे, प्रेम विजय सुरवाडे, राज सुरवाडे आणि छाया माणिक वानखेडे, सपना सिद्धार्थ सुरवाडे, शांताबाई पांडुरंग सुरवाडे, शारदा विशाल सुरवाडे, सोनी प्रेम सुरवाडे व इतर दोनजण अशा चौदा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या भागात आता तणावपूर्ण शांतता आहे.

Web Title: Two groups clashed in Rajmalati town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.